धूळवडीनिमित्त बाजारात मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या रंगाच्या गुलालासोबत काही रासायनिक रंग विक्रीसाठी येत असल्यामुळे या रंगाना गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणवादी आणि वैद्यकीय संघटनांनी विरोध केल्यानंतरही रंग विक्रेते त्याकडे अक्षरश: कानाडोळा करीत आहेत. रासायनिक पदार्थापासून तयार करण्यात आलेले रंग आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्यामुळे त्यांच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर्षी मात्र रंग खरेदी करताना ग्राहक व चिल्लर व्यापाऱ्यांकडून चौकशी केली जात असल्यामुळे अनेक रंगविक्रेते अडचणीत आले आहेत.
रंगपंचमीनंतर उद्भवणारे त्वचारोग आणि डोळ्याच्या विकारांच्या पाश्र्वभूमीवर धूळवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित रंगाच्या विरोधात काही गेल्या काही वर्षांत पर्यावरणवादी संघटनांनी शहरातील बाजारपेठेमध्ये अशा रंगांच्या विक्रीला मोठय़ा प्रमाणातविरोध केला असताना दुकानदारांनी रंगाची बिनधास्तपणे खरेदी सुरूच ठेवली होती. त्यामुळे अनेक लोकांना रासायनिक रंगाचा त्रास झाला होता. रासायनिक रंगाविषयी जागृती केली जात असताना दरवर्षी मोठय़ा प्रमाणात असे रंग विक्रीला येत आहेत आणि त्याकडे कोणाचे लक्ष नाही. वॉर्निश किंवा टायर जाळून तयार केलेल रंग हे त्वचेला घातक असतात मात्र मोठय़ा प्रमाणात हे रंग धुळवडीला उपयोगात आणले जात असल्याचे दिसून येते.
बाजारात असलेले रासायानिक रंगाविषयी काही रंग विक्रेत्याशी संपर्क केला असता त्यांनी रंगात काय वापरण्यात येते त्याची माहिती देण्यास नकार दिला. दरवर्षी जे रंग येतात तेच रंग यावर्षी बाजारात आल्याचे विक्रेते सांगत आहेत. अनेक रंगविक्रेत्यांनी रंग आम्ही घरीच तयार करीत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी तीन महिन्यापासून तयारी करीत असल्याचे सांगितले. मात्र, रंगासाठी काय सामुग्री वापरली जाते, त्यात कोणत्या रसायनाचा वापर करतात आणि हे रंग बनविण्यासाठी लागणारी साधनसामुग्री कोठून आणली जाते, असे प्रश्न विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. चार दिवसांवर रंगपंचमी आली असून सध्या धंद्याची वेळ आहे. गिऱ्हाईकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. रंगपंचमी संपल्यानंतर बोलू, अशी उत्तरे रंगविक्रेते देत आहेत.
काही रंग विक्रेत्यांना इको फ्रेंडली रंग आणि रासायनिक रंग यामधील फरक कळत नसल्याचे सांगून गेल्या अनेक वषार्ंपासून ते विक्री करीत आहे त्यामुळे गिऱ्हाईक येतात आणि रंगाच्या भावानुसार रंग मागतात. तेच रंग त्यांना देत असतो. त्यामुळे कुठल्या रंगाला काय म्हणतात किंवा कुठला रंग आरोग्याला अपायकारक आहे याची माहिती नसल्याचे एका विक्रेत्यांनी सांगितले. विविध पर्यावरणवादी संघटनांसह, आरोग्य संघटना आणि सामाजिक वनीकरण विभागाने रासायानिक रंग वापरू नये, असे आवाहन केले आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी नैसर्गिक रंग तयार केले जातात. मात्र, नागपूरची लोकसंख्या बघता विभागाकडे नैसर्गिक रंगाचा तेवढा साठा नाही त्यामुळे रासायनिक रंग अपायकारक आहेत, हे माहीत असतानाही अनेक लोक ते विकत घेऊन धूळवड साजरी करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा