व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बुद्धिबळ खेळाचा उपयोग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळ खेळाचा समावेश व्हावा, यासाठी पालक व शिक्षकांची पूरक मानसिकता होणे गरजेचे आहे. त्यासाठी माझे प्रयत्न राहतील असे मत ग्रँडमास्टर व अर्जुनपदक विजेती भाग्यश्री ठिपसे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी बाबा इंदुलकर, अरुण मराठे उपस्थित होते.
बुद्धिबळ खेळामुळे व्यक्तिमत्त्व कसे बहरते याचे स्पष्टीकरण देत ठिपसे म्हणाल्या, पालकांच्या बुद्धीची परिपक्वता करण्याचे काम या खेळामुळे होते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याची मानसिकता यातून येते. ताणतणावाला सक्षमपणे सामोरे जाताना कार्यक्षमतेतही वाढ होते. पाश्चात्त्य देशांनी हे सिद्ध करून दाखविले आहे.    
तामिळनाडू, पंजाब, हरयाणा यांसारख्या राज्यांनी बुद्धिबळ खेळाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला आहे. याच वाटेने महाराष्ट्र शासनानेही जाण्याची गरज आहे. मात्र या खेळाची राज्यात उपेक्षा होताना दिसते, अशी खंत व्यक्त करून ठिपसे म्हणाल्या, देशात बुद्धिबळाचा विकास व विस्तार झालेल्या पहिल्या १० राज्यांत महाराष्ट्राचा समावेश नाही. राष्ट्रीय पातळीवर राज्यातील खेळाडू चमकावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. ती वाढीस लागण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा