त्याचे प्रत्येक पुस्तक बाजारात आले आणि लगेच हातोहात खपले. या पुस्तकांनी त्याला पैसा आणि नावलौकिक दोन्ही मिळवून दिले. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट या साहित्यलेखनामुळे त्याच्या आयुष्यात झाली ती म्हणजे त्याला चित्रपट जगताचे दालन खुले झाले. आज त्याने लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकावर चित्रपट झाले आहेत. आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत बस्तान मांडणारा चेतन एकमेव लेखक आहे. कथालेखनाबरोबरच आता थेट चित्रपटासाठीच पटकथालेखन करण्याचा निर्णय चेतनने घेतला असून सलमान खानसाठी ‘किक’ या चित्रपटाची कथा लिहिण्यात तो सध्या व्यग्र आहे.
चेतनच्या दोन पुस्तकांवरचे चित्रपट सध्या चर्चेत आहेत. त्याच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या पुस्तकावर अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘काय पो चे’ हा चित्रपट तयार झाला आहे. यूटीव्हीची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर त्याच्या ‘टू स्टेट्स’ या पुस्तकावरचा चित्रपट निर्मिती अवस्थेत असून त्यात अर्जुन कपूर आणि अलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘काय पो चे’विषयी बोलताना, चेतनने या चित्रपटासाठीची पटकथाही आपणच लिहिली असल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘माझ्या पुस्तकावर आधारित प्रत्येक चित्रपटाच्या पटकथा-लेखन आणि निर्मिती प्रक्रियेत मी सहभागी असतोच असे नाही. ‘काय पो चे’ करत असताना अभिषेक ने मलाच पटकथालेखनही करायला सांगितले. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमबरोबर मी पूर्ण प्रक्रिया अनुभवली आहे’, असे चेतनने सांगितले. ‘पुस्तकाचा लेखक म्हणून मी चित्रपटाच्या पटकथालेखनात ढवळाढवळ करत नाही. ही दोन्ही माध्यमे वेगळी आहेत. चित्रपटासाठी कथा लिहिताना मूळ कथेत बदल करावेच लागतात, हे लेखक म्हणून मला चांगलेच माहीत असल्याने मी कोणत्याही प्रकारचे र्निबध निर्मात्यांवर घालत नाही’, असेही त्याने स्पष्ट केले. तरूण पिढी पुस्तकांवर प्रेम करत नाही, असा सुदैवाने आपल्याला तरी अनुभव आलेला नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
‘माझ्या कथा चित्रपटांसाठी निवडल्या जातात मग मी चित्रपटासाठीच कथालेखन का करू नये, असा विचार माझ्या मनात आला. सुदैवाने सलमान खानने ‘किक’साठी कथा लिहिण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. ‘किक’ हा तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे आणि आता मी या चित्रपटाच्या कथेवर काम करतो आहे’, असे चेतनने सांगितले. याआधी चेतनच्या ‘वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर’ या पुस्तकावर सोहैल खान याने ‘हॅलो’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. स्वत: सलमाननेही या चित्रपटात खास भूमिका केली होती. त्यानंतर आलेल्या चेतनच्या ‘फाइव्ह पॉइंट समवन’ या चित्रपटावर आधारित ‘थ्री इडियट्स’ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा