मुंबई-आग्रा महामार्गावर होणाऱ्या उड्डाण पुलालगतच्या रस्त्यांवर शहरातील नागरिकांची होत असलेली वाहतुकीची गैरसोय लक्षात घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित करण्याची गरज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. अपघातप्रवण क्षेत्राची पाहणीही भुजबळ यांनी सोमवारी केली.
पाहणीनंतर भुजबळ यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन उड्डाण पुलाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत वाहतूक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन देणे, विशेषत: इंदिरानगरलगत उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक, अवजड वाहनांना भुयारी मार्गातून जाण्यास मज्जाव करण्यासाठी उंचीरोधक उपाय करण्याचे निर्देश दिले. प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त संजय खंदारे, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक प्रशांत खोडस्कर, अभियंता एच. जी. हरसुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नागनाथ जळकोटे उपस्थित होते. तीन ते चार आठवडय़ात उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर शहरातील वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेने वाहतूक विभाग कार्यान्वित केला असून त्यामधील अभियंतापदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. पोलीस आयुक्तांनी गेल्या काही वर्षांतील अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी सादर केली. आकडेवारी कमी झालेली असली तरी ‘शून्य टक्के’ अपघात हे आपले उद्दिष्ट असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी राणेनगर, इंदिरानगर भुयारी मार्ग स्थळाची पाहणी करून अशा ठिकाणी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. इंदिरानगर आणि गोविंदनगर लिंक रोडवर नाशिक मनपाच्या जागेवर जंक्शन विकसित करण्यात येणार आहे. मुंबई नाका चौफुलीही कमी करण्यात येणार आहे. द्वारका चौकात पादचारी मार्ग सुरू होत असून महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी सध्या तत्काळ उपाययोजना केल्या जात असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यानंतर त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले. नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. यावेळी संदीप दिवाण, डी. एस. स्वामी, गणेश शिंदे हे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा