आरोग्य विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीमुळे निरंतर शिक्षणाला चालना मिळणार असून वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन प्राप्त होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात  बांधण्यात आलेल्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित हेही उपस्थित होते.
भुजबळ यांनी विद्यापीठाने अद्ययावत शिक्षणाबरोबरच नाविण्यपूर्ण संशोधनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रत्येक क्षेत्रात नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा ध्यास घेतला पाहिजे. ग्रामीण आणि आदिवासी भागात सिकलसेल अनेमिया आजार मोठय़ा प्रमाणात असून विद्यापीठाने या आजाराच्या उच्चाटनासाठी संशोधन करण्याची गरज आहे. विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदांचे आयोजन करण्यात यावे. नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांंमध्ये शहरी भागातील विद्यार्थी अधिक असतात. मात्र ग्रामीण भागात विविध आजारांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. यामुळे शहरी भागातील भावी डॉक्टरांनी ग्रामीण भागातील आजारांबाबत माहितीपर संशोधन करून रुग्णसेवा करण्याचा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. विजयकुमार गावित यांनी राज्यातील आरोग्य सेवा दर्जेदार होण्यासाठी आरोग्य शिक्षणाला दिशा देण्याचे काम आरोग्य विद्यापीठ करीत असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकविणे तसेच शिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि माहिती मिळविण्यसाठी या प्रबोधिनीची आवश्यकता होती. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात सुसंवाद कमी असल्याने डॉक्टरांना अशा प्रकारच्या ज्ञानाची अभ्यासक्रमात आवश्यकता आहे. या प्रकारचे शिक्षण प्रबोधिनीतील शिक्षकांना दिल्यास त्याचा निश्चितच त्यांना लाभ होऊ शकतो. विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाबरोबरच संशोधनासाठी अजून प्रयत्न करून नाविण्यपूर्ण संशोधनासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होईल. विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून यातील महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यात आला आहे.
तसेच सेवानिवृत्ती वेतन, अंशदायी निवृत्ती वेतन योजना आणि नवीन पदे मंजूर करण्याबाबत आगामी बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रास्तविकात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरूण जामकर यांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकांना अद्ययावत, दर्जेदार आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी या प्रबोधिनीची उभारणी करण्यात आल्याचे नमूद केले. या प्रबोधिनीत शिक्षकांसाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर यांनी मानले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी केले.