वृक्षसंवर्धन व रोपलागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज वनश्री पुरस्कार योजना राबवली जाते. यंदा औरंगाबाद विभागातून वैयक्तिक पातळीवरील ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार नांदेडमधील प्राचार्य मोतीराम केंद्रे यांना जाहीर झाला.
राज्य सरकारच्या वतीने सन १९८८ पासून सामाजिक वनीकरणअंतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात काम करणाऱ्या व्यक्ती-संस्थांना वनश्री पुरस्कार दिला जातो. सरकारने याची व्याप्ती वाढवताना विभागस्तरावरही पुरस्कार सुरू केले आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज वनश्री पुरस्कार या नावाने रोख रकमेच्या स्वरूपात पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा जलसंधारण विभागाने केली. यात औरंगाबाद विभागातून वैयक्तिक पहिल्या पुरस्कारासाठी शेकापूर (तालुका कंधार, जिल्हा नांदेड) येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मोतीराम पंडितराव केंद्रे यांची निवड झाली. शैक्षणिक संस्था स्तरावर राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत (तालुका अंबड, जिल्हा जालना) व सेवाभावी संस्था स्तरावर संत नामदेव सेवाभावी संस्था सरस्वती नगर, (अकोला रस्ता, िहगोली) यांना पुरस्कार देण्यात आला.

Story img Loader