तोटय़ातील सहकारी साखर कारखाने अनपेक्षितरीत्या कमी किमतीने विक्री प्रकरणी संशय व्यक्त करून, बडगा उगारणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या रडारवर आता सहकारी कारखान्यांचे खासगीकरण गांभीर्याने घेतले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. साखर सम्राटांचे ‘नेटवर्क’ सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा आणखी एक शह असल्याचे मानले जात असून, खासगी साखर साम्राटांवर मुख्यमंत्री कसा चाप लावतील याकडे महाराष्ट्राचे निश्चितच लक्ष लागून राहील.
सहकाराचे गाढे अभ्यासक व मार्गदर्शक दिवंगत थोर विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर शेरे (ता. कराड) येथे काल बुधवारी शेतकरी मेळाव्यात बोलताना मुख्यंमत्र्यांनी सहकारी साखर कारखाने खासगीरीत्या चालविण्याचा पायंडा चुकीचा असल्याची खंत व्यक्त केली. यंदा घटलेले पाऊसमान पाहता दुष्काळ आणि अडचणीत असणारी साखर कारखानदारी यांचा विचार होऊन साखर दराचा योग्य तोडगा निघावा आणि तो निर्णय साखर कारखान्यांचे मालक असलेले ऊस उत्पादक सभासद तसेच संचालक मंडळाने एकत्र बसून घेतला जावा, अशी भूमिका मांडली. दरम्यान, सहकारातील बेशिस्तपणावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत आता पारदर्शी कारभारातून सहकाराच्या उद्धाराची अपेक्षा व्यक्त केली. योग्य निर्णय घेतले गेले नाहीत तर सहकार चळवळ अडचणीत येईल, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याची संधी घरच्या मैदानावरील या शेतकरी मेळाव्यात दवडली नाही. सहकारातील भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करणाऱ्या चव्हाणांनी सहकारी साखर कारखाने कमी होत असून, त्याच्या खासगीकरणा विरोधात दंडच थोपटले. जरी सत्तेत साखर सम्राटांचे आधारवड असलेली राष्ट्रवादी काँग्रेस असली तरी सहकारी साखर कारखान्यांना कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटून ते आपल्या दावणीला बांधणाऱ्या धनदांडग्या खासगी साखर सम्राटांवर राज्य सरकार मेहरबान नसल्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे जनक दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच सहकारी साखर कारखानदारीच्या अडचणींवर, तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या खासगीकरणाच्या पेव फुटीच्या वातावरणावर उलटसुलट चर्चा होत असल्याची साहजिकच शोकांतिका म्हणावी लागेल. यशवंतरावांच्या कर्मभूमीत सातारा जिल्ह्य़ासह साखर पट्टय़ात जिल्हावार दोन, चार कारखाने कर्जबाजारीपणातून खासगीकरणाच्या वाटेवर असल्याची सद्य:स्थिती आहे. यापूर्वी कर्जाच्या डोंगरामुळे काही कारखाने कवडीमोल किमतीला विकले गेल्याचीही उलटसुलट चर्चा मुख्यमंत्री पृम्थ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने घेऊन त्याचा भांडाफोड करण्याचे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्षाला अनेक धक्के देताना, सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण होत असलेल्या प्रक्रियेविरोधात आपली रोखठोक भूमिका मांडून राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा एकदा कोंडी करण्याचा चंग बांधला असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, याला राजकीय रंगही असल्याचे गृहीत धरून मुख्यमंत्र्यांच्या एकंदर भूमिकेची नेमकी फलश्रुती काय याबाबत जाणकारांच्या नजरा लागून राहणार आहेत. 

Story img Loader