वरळीच्या कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील अनधिकृत सदनिका वाचविण्यासाठी कायद्याच्या चौकटीत जे करणे शक्य आहे ते करण्यात येईल. या रहिवाशांना सर्वतोपरीने मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिले. त्यामुळे कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील रहिवाशांना किंचितसा दिलासा मिळाला.
सवरेच्य न्यायालयातपर्यंत लढूनही पदरी निराशा आलेल्या कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील रहिवाशांना ३ ऑक्टोबर रोजी घरे रिकामी करावी लागणार होती. परंतु आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने त्यांचा जीव भांडय़ात पडला. आजचे मरण उद्यावर गेल्याची भावना झालेल्या २०० रहिवाशांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून सोमवारी सकाळी मलबार हिल येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षां निवासस्थानावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्र्यांनी या रहिवाशांची भेट घेतली. त्यावेळी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा, भाजप नेत्या शायना एन.सी., शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राहुल नार्वेकर उपस्थित होते. विकासकाकडून आपली कशी फसवणूक झाली याचा पाढा रहिवाशांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढे मांडला. कॅम्पा कोलातील रहिवाशांना सर्वतोपरीने मदत करण्यात येईल. त्यांची घरे वाचविण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जेवढी मदत करता येईल तेवढी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी मदत केली तर आपली घरे वाचू शकतील, अशी आशा रहिवाशांना होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader