कुकडी प्रकल्पाचे पाणी सीना धरणात सोडावे, तसेच कर्जतमधील बंद केलेल्या जनावरांच्या छावण्या पुन्हा सुरू कराव्यात यासाठी उद्या (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी कर्जत तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी सुरू केलेले बेमुदत उपोषण आज सायंकाळी स्थगित ठेऊन शिष्टमंडळ मुंबईस रवाना झाले. जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, बाळासाहेब साळुंके, सरपंच बबनराव बचोटे, उपसरपंच किरण पाटील, शहाजी तापकिर, अ‍ॅड. माणिकराव मोरे, आनंदराव गांगर्डे, एकनाथ गांगर्डे तसेच मिरजगाव व निमगाव गांगर्डे परिसरातील पदाधिकारी मुंबईतील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले. पांडुळे यांनीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक होत असल्याची माहिती दिली. मिरजगाव परिसरात पशुधन वाचवण्यासाठी सुरु केलेल्या जनावरांच्या छावण्या पुरेसा चारा उपलब्ध झाल्याचे कारण दाखवून बंद करण्यात आल्या आहेत, त्या पूर्ववत सुरु कराव्यात यासाठी पांडुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कुकडीचे पाणी सोडण्याबाबत असमर्थता व्यक्त करत त्याऐवजी हवे तितके टँकर देऊ, असे आश्वासन देत उपोषणकर्त्यांची बोळवण केली. त्यामुळे आंदोलकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला. थोरात यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी उद्या मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

Story img Loader