शासकीय दुग्धविकास विभाग व जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या निष्क्रीय व भोंगळ कारभारामुळे चिखलीतील ३५ वर्षे जुने शासकीय दूध संकलन केंद्र आता अखेरच्या घटका मोजत आहे. लाखोंची यंत्र सामुग्री असलेले हे दूध संकलन केंद्र भंगार झाले असून ते केव्हाही बंद पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्य़ातील शेतकरी व दूध उत्पादकांसाठी शासकीय दूध योजनेअंतर्गत नांदुरा, मोताळा व चिखली येथे दूध संकलन व शीतकरण केंद्र व बर्फाचा कारखाना सुरू करण्यात आला होता. या दूध केंद्राचे मुख्यालय नांदुरा करण्यात आले होते, परंतु दूध संकलन केंद्राकडे शासनाचा दुग्ध व्यवसाय विभाग, जिल्हा दुग्ध संघ व सहकार खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने काही वर्षांपूर्वीच नांदुरा व मोताळा येथील दूध संकलन व शीतकरण केंद्र व बर्फाचा कारखाना बंद पडला.
चिखली येथे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले त्या वेळी ४० ते ५० हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येत होते, परंतु हळुहळू दुधाचा शासकीय दर कमी झाल्याने व चुकीची तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया यामुळे योजनेत भ्रष्टाचार वाढला व या संकलन केंद्राचे तीनतेरा वाजले. त्या वेळी २० हजार रुपये एकरप्रमाणे पाच एकर जमीन खरेदी करून दूध केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतु, काही वर्षांत शहराची वाढ झाल्यामुळे या केंद्राच्या परिसरातच मोठय़ा प्रमाणावर वस्ती झाली. परिणामी, या भागातील जमिनीचे भाव वाढल्याने पाच एकराची किंमत कोटय़वधी रुपयांची झाली. एकेकाळी शेतकऱ्यांचा कैवारी ठरलेले व दूधगंगा म्हणून ओळखले जाणारे केंद्र शेवटची घटका मोजत आहे. अवघ्या दोन-तीन महिन्यांत हे केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तर या केंद्राच्या कोटय़वधीच्या जमिनीवर येथील अनेक राजकारणी व बिल्डरांचा डोळा आहे.
प्रारंभी या दूध केंद्रात २५ ते ३० कर्मचारी होते. सद्यस्थितीत नाममात्र आठ कर्मचारी आहेत. दूध केंद्राच्या इमारतीची दुर्दशा झाली असून लोखंडी शटर्स सडले आहेत. परिसरात गाजर गवत व प्रचंड घाण साचल्यामुळे या केंद्राला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्य़ात दूध संकलन करणाऱ्या ५० ते ६० संस्थांपैकी नाममात्र चार ते पाच संस्था आज कार्यरत आहेत. विदर्भ पॅकेज अंतर्गत पशुपालन व दुधाळ जनावरांसाठी कोटय़वधीचा खर्च केला जात असतांना या केंद्राची मरणासन्न अवस्था दुग्ध व्यवसायासाठी अभिशाप ठरली आहे.
चिखलीचे शासकीय दूध संकलन केंद्र मरणासन्न अवस्थेत
शासकीय दुग्धविकास विभाग व जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या निष्क्रीय व भोंगळ कारभारामुळे चिखलीतील ३५ वर्षे जुने शासकीय दूध संकलन केंद्र
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-10-2013 at 08:45 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chikhali official milk collection center in bad condition