जिल्ह्यातील बहुतांश भागांत अजूनही टंचाईची परिस्थिती कायम असून माणसांप्रमाणेच जनावरांनाही पाणी मिळणे मुश्कील आहे. दुष्काळ निवारणासाठी शासनावर विसंबून राहण्यापेक्षा स्वत: काही प्रयत्न करणाऱ्यांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याइतपत. मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ येथील प्रमोद मोरे हे त्यापैकीच एक. मोरे यांनी स्वखर्चाने गावातील दुष्काळ हटविण्यासाठी खोदलेली विहीर आज संपूर्ण गावाची तहान भागवीत आहे.
अनेक वर्षांपासून चिखलओहळ हे गाव टंचाईग्रस्त आहे. जनावरांनाही पाणी मिळणे अवघड झाल्याने येथील अनेकांना गाव सोडून जावे की काय, असे वाटू लागले होते. गावात पाणी टंचाई असल्यामुळे युवकांच्या लग्नासही अडथळा निर्माण होऊ लागला. या गावातील युवकांशी कोणी लग्न करण्यास धजावेनासे झाले. गावाचा विकासही खुंटला. लोकप्रतिनिधींनीही गावाकडे दुर्लक्ष केले. नेहमीच्या आश्वासनांना ग्रामस्थही कंटाळले आहेत. सर्वानाच आपले भविष्य अंधारात दिसू लागले. अशा वेळी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा, असा विचार मोरे यांच्या मनात आला. त्यांनी गावातील कोरडेठाक पडलेल्या तळ्यात लाखो रुपये खर्च करून विहीर खोदण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. विहिरीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले. विहिरीचे संपूर्ण काम पक्क्या स्वरूपात करण्यात आले.
कूपनलिकाही त्यांनी खोदली. परंतु ग्रामस्थांना पाणी ने-आण करण्यासाठी तसदी होऊ नये म्हणून मोरे यांनी गावातील पाण्याच्या टाकीपर्यंत स्वखर्चाने जलवाहिनी टाकली. गावातच गुरांसाठी दोन मोठे कायमस्वरूपी हौद बांधले. या प्रयत्नांमुळे दुष्काळग्रस्त चिखलओहोळने टंचाईच्या समस्येवर मात केली आहे. मोरे यांना या प्रयत्नात सरपंच मंगला खैरनार, उपसरपंच नामदेव पवार, सोसायटीचे अध्यक्ष बसंतीलाल जगताप, नारायण खैरनार, भिकन शेळके आदींची चांगली साथ मिळाली.