तळोजामध्ये कामगारांची कमतरता आहे. त्यामुळेच आसाम, ओदिशा, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून कामगारांची आयात येथे केली जाते. औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांच्या उज्ज्वल भवितव्यामागे बालकामगारीचा काळा चेहरा तळोजा औद्योगिक वसाहतीमधील शुक्रवारच्या छाप्यानंतर समोर आला. दलाल प्रत्येक बालकामगार ४०० रुपयांना कंपनीच्या कंत्राटदारांना विकत असल्याचे सत्य पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उल्का सी फ्रुड या कंपनीमधील शुक्रवारी पोलीस, कामगार आणि औद्योगिक सुरक्षा विभागाने सयुक्तिक मारलेल्या छाप्यामध्ये ९७ मुलेमुली कामगारांची सुटका करण्यात आली होती. यापैकी २४ बालकामगार होते. या कामगारांना आसाम येथून महाराष्ट्रातील तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये आणले कोणी याबाबत शोध सुरू आहे. या बालकामगार विक्रीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी तळोजा पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. कंत्राटदाराल ज्या दलालाने कामगार विक्री केले होते. त्या संबंधित दलालाचे नाव पोलिसांना अद्याप समजू शकले नाही. पोलिसांचे पथक या दलालाचा शोध घेत आहेत. हा दलाल महिन्यातून एक-दोनदा कामगार घेऊन कंपनीच्या प्रवेशद्वारावर येत असे एवढीच माहिती पोलिसांना कंत्राटदाराने दिल्याने तळोजा ते आसाम या पल्ल्यावर कामगारविक्रीच्या या रॅकेटचा कसा उलगडा होईल याबाबत साशंकता आहे.
परभाषिक कामगार का हवेत?
औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक कामगारांना कामावर ठेवल्यास ते सहा महिने ते एका वर्षांतच कामगार-पिळवणुकीविषयी बंड पुकारतात. वेळीच हक्कासाठी संघटना स्थापन करतात. त्यातुलनेत हे परभाषिक कामगार चुपचाप मिळेल ते वेतन घेऊन कोणाही विरुद्ध आवाज न करता दिलेले काम १४-१६ तासांचा दिवस भरून पूर्ण करतात. या कामगारांची कोणत्याही सार्वजनिक सुटय़ांची अपेक्षा नसते. सणासुदीच्या वेळी मराठी कामगार ज्या वेळी सुटय़ांवर असतात त्या वेळी हेच कामगार कंपनीचे उत्पादन काढण्याची ताकद ठेवतात. या कामगारांचे कुटुंब येथे नसल्याने कौटुंबिक कारणाच्या रजेकडे यांचा कल कमी असतो. त्यामुळेच हे कामगार व्यवस्थापन आणि कंत्राटदारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा