मुलांना शिक्षा केल्याशिवाय त्यांच्यात शिस्त निर्माण होणार नाही, असा समज बहुतांश पालकांचा आहे, पण मुलांशी प्रेमाने वागल्यास त्यांच्यात कायमस्वरूपी बदल होतात, हे मानसशास्त्रज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी सोदाहरण पटवून दिले. शिक्षेचे अधिकार शिक्षकांवर सोपवून पालकांनी त्यांचा हस्तक्षेप टाळावा, कारण माणूस चुकांमधूनच सुधारत असतो, हा मानसशास्त्रीय दृष्टीकोन पालकांनी समजून घेणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही तरी चालेल, पण आपण मुलांवर अटी टाकत असल्यामुळे त्यांच्यावर तणाव येऊन नकारात्मक भावना बळावते. याकरिता मुलांना चुकांची जाणीव होऊ द्या आणि त्यांचे स्वयंनिर्णय घेण्यास त्यांना प्रवृत्त करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे सीताबर्डीवरील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनात सभासदांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या गुणवंत पाल्य गौरव समारंभात प्रा. राजा आकाश प्रमुख अतिथी होते. अध्यक्षस्थानी राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) डॉ. शेषराव पाटील होते.
जीवनात यशस्वी हाण्यासाठी वक्तशीरपणास फार महत्त्व असून गुरूशिवाय जीवनाला आकार मिळत नाही. त्यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे. मुलांच्या आरोग्यासाठी फळे व सलाद यांचा समावेश असणारा समतोल आहार घेणे शरीरास हितकारक असून फास्टफूड घेणे टाळावे, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी इयत्ता दहावीत ९७.४० टक्के गुण घेऊन प्रथम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या रक्षित काथवटे, तर इयत्ता बारावीत प्रथम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दिपाली वडणारे यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पुरस्कार व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ६१ गुणवंत पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद जाधव व संचालन प्रदीप शेंडे यांनी केले. पुष्पा धोटे यांनी आभार मानले.

Story img Loader