आपल्या वर्गमैत्रिणीचा विनयभंग केल्याच्या कथित आरोपाप्रकरणी एका पाच वर्षांच्या मुलाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केल्याची घटना नुकतीच घडली. हा प्रकार कायदेशीर आहे की नाही हा मुद्दा कायद्याच्या कक्षेत असला तरी, लहान मुलांची मानसिकता समजून घेण्यात मोठी माणसे कुठेतरी कमी पडत आहेत का यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात. पाच वर्षांच्या मुलांची नेमकी मानसिकता आणि पालकांनी घ्यावयाची खबरदारी याचा एक आढावा.
लहान मुलांमध्ये अशा प्रकारची समस्या अनेकदा दिसून येते. लहान मुलांमध्ये कोणतीही लैंगिक भावना जागृत झालेली नसते. त्यामुळे असे काही घडले तर त्यामागची कारणे आधी लक्षात घ्यायला हवीत. हा गुन्हा नाही तर समस्या आहे. लहान मुले अशा प्रकारे वागतात तेव्हा त्यामागे पाच कारणे असू शकतात.
* आताच्या मुलांना अनेक ठिकाणांहून माहितीचे स्रोत उपलब्ध आहेत. टीव्ही, मोबाइल, इंटरनेट अशा माध्यमांतून मुलांपर्यंत ती माहिती पोहोचली असेल.
* मुलांनी प्रत्यक्षात ते पाहिले असेल.
* त्याच्यासोबतही अशा प्रकारे कोणीतरी वागले असेल व ते त्याची पुनरावृत्ती करत असेल.
* अगदी अपवादात्मकरीत्या पण मुलाच्या शरीरात हार्मोनच्या समस्या असतील व त्यामुळे असे वागण्यास ते प्रवृत्त झाले असेल.
* हा लहान मुलांच्या खेळण्यातील प्रयोगाचा भागही असू शकतो.
या पाच कारणांपकी नक्की कोणत्या कारणामुळे मूल असे वागले हे निश्चित झाले की त्यावर उपायही करता येतात. यासाठी मुळात हा गुन्हा नसून ती समस्या असल्याचे समजून घेणे गरजेचे आहे.
पालकांची जबाबदारी
अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजून घेण्यासाठी पालकांची मोठी जबाबदारी असते. अशा घटना या मुलांच्या बाबतीत यापूर्वी काहीतरी चुकीचे घडले असल्याचे संकेत असतात. कोणत्याही मुलाच्या बाबतीत ही घटना घडली की काय झाले, काय झाले. असे करत त्या मुलाच्या-मुलीच्या मागे लागू नका. या घटनेतील मुलाला आणि मुलीला त्यासंबंधी खोदून खोदून विचारायला सुरुवात केली की आपण काहीतरी चुकीचे केले आहे, आपल्या बाबतीत काहीतरी भयानक घडले आहे अशी अपराधाची जाणीव निर्माण होते व मुले कोषात जातात. याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. मुलांना आवडणाऱ्या कृती-चित्रकला, हस्तकला, नृत्य करू द्या. त्यातून ते व्यक्त होत असते. मूल सर्वसामान्य रीतीने संवाद साधू लागल्यावर, काही झालेय का याची चौकशी करा. मूल हात लावू देत नसेल, आंघोळ करायला टाळत असेल तर मात्र समस्या अधिक गंभीर आहे, हे लक्षात घ्या. अशा घटनांनंतर मुलांचे व कुटुंबीयांचेही समुपदेशन करणे आवश्यक असते. वेळीच योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळाले तर ही मुले अगदी सर्वसामान्य आयुष्य जगतात. मूल गप्प राहिले तरी किशोरवयात लैंगिक नात्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ शकतो. लग्नानंतरही अनेकांना सामान्य नाते टिकवताना त्रास होत असल्याची उदाहरणे दिसतात.
डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ
लैंगिक विषयावर बोलणे आवश्यक
लहान मुलांना आपण बाहेर फिरायला नेत असतो, त्यांच्यासमोर चित्रपट, टीव्हीवरील मालिकाही पाहात असतो, इतकेच नव्हे तर एखादा मुलगा चित्रपटाची गाणी ऐकताना शांत बसतो म्हणून त्याला सतत पालक तीच गाणी लावून देतात. या सर्वाचे ही मुले बारकाईने निरीक्षण करत असतात. यातून त्यांना अनेक प्रश्न पडतात आणि त्यातून मुले त्यांची मते तयार करत असतात. पाच-सहा वर्षांच्या मुलाचीही स्वत:ची अशी मते असतात आणि ती मुले त्यांच्या मतांवर ठाम असतात. ही मते चुकीची का बरोबर हे त्यांना समजत नसते. पण त्यांच्या या मतांना योग्य दिशा देणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलं जे पाहतात त्यावरून आपले विश्व निर्माण करत असतात. पाच-सहा वर्षांची मुलगी अनेकदा मी मोठी झाल्यावर माझे लग्न होणार, मला मुलं होणार अशा गोष्टी बोलते. त्या वेळेस अनेक पालक अजून तू लहान आहेस असे म्हणून हा विषय सोडून देतात. पण प्रत्यक्षात पालकांनी अशा वेळी त्यांच्या सर्व प्रश्नांची सर्मपक उत्तरे दिली पाहिजेत. विशेषत: लैंगिक विषय आल्यावर तर पालक मुलांशी बोलणेच टाळतात. पण तसे न करता त्यांच्याशी मोकळेपणाने याबाबत संवाद साधणे आवश्यक आहे. मुलांशी संवाद साधणे हे अशा प्रकारच्या अनेक समस्या रोखू शकते. प्रत्येक वेळी संवाद साधण्यासाठी कारणच हवे असे नाही. काही वेळेस वेगवेगळे विषय काढून त्यांची त्याबाबतची मते जाणून त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. या संवादाचा सध्या खूप अभाव दिसतो यामुळे मुलांची लहानपणी एखाद्या गोष्टीबद्दल जी मतं तयार होतात तीच मतं कायम राहतात. म्हणूनच मुलांशी संवाद साधून त्यांच्या ज्ञानात भर घालून त्यांचे विचार परिपक्व करणे ही पालकांची मोठी जबाबदारी आहे.
प्रियदर्शनी हिंगे, लैंगिक शिक्षण कार्यकर्ता आणि शिक्षिका