लोहशिंगवे परिसरातून सात वर्षीय मुलाचे अपहरण
शहरातील वेगवेगळ्या भागातून मुले बेपत्ता होण्याचे प्रकार सुरूच असून आता अपहरणाची आणखी एक घटना लोहशिंगवे भागात घडल्याचे पुढे आले आहे. मुले बेपत्ता होण्याची ही गेल्या काही दिवसातील सहावी घटना असल्याने पालक वर्गात अस्वस्थता पसरली आहे. या घटनाक्रमांमागे कोणी टोळी कार्यरत आहे की पालकांचा बेजबाबदारपणा अथवा इतर काही कारण यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मागील काही दिवसात शहरातून मुले बेपत्ता अथवा त्यांचे अपहरण होण्याचे प्रकार वाढले आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रकार घडला. या विद्यार्थिनीला कोणी मोटारीत बसविले. परंतु, तीने प्रसंगावधान राखून स्वत:ची सुटका करून घेतली. पंचवटीतील सीतागुंफा येथील पुणे विद्यार्थी वसतीगृहातील मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर शरणपूर रस्त्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. या घडामोडी सुरू असतानाच लोहशिंगवे येथे काही दिवसांपूर्वी तसाच प्रकार घडल्याचे उघड झाले. १७ ते २४ नोव्हेंबरच्या दरम्यान हा प्रकार घडला. रवींद्र हांडगे हा सात वर्षीय मुलगा घराबाहेर खेळत असताना कोणीतरी त्याला पळवून नेले. या संदर्भात त्याचे वडील सुकदेव हांडगे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुकदेव हांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घराशेजारील मित्रासमवेत रवींद्र खेळत असताना लहवीत रेल्वे स्थानकावर गेला आणि तेथून तो गायब झाल्याची माहिती संबंधित मित्राकडून पुढे आल्याचे सांगितले.गेल्या काही दिवसात मुले बेपत्ता होण्याचे प्रकार वाढल्याने पोलीस यंत्रणेने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली आहे. शाळांनी सुरक्षारक्षक नेमून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांची माहिती नोंदवावी असेही पोलीस यंत्रणेने म्हटले आहे. पोलिसांनी शाळेबाहेर उभ्या राहणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करावी, पालकांच्या तक्रारी लक्षात घ्यावात, असे साकडे मुख्याध्यापकांनी घातले आहे. ‘रायझिंग डे’च्या निमित्ताने पोलीस यंत्रणेने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातर्फे आयोजित कार्यक्रमात कॅन्टॉनमेन्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांंना सहभागी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या अडी अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी कोणकोणत्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात याची माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक के. एस. सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक पाटील आदी उपस्थित होते.
या घटनाक्रमामुळे पालक वर्गात अस्वस्थता पसरली असून विद्यार्थी सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलीस, शाळा व वैयक्तिक पातळीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आतापर्यंत घडलेल्या घटनांवर नजर टाकल्यास काही घटना या घराबाहेर तर काही घटना शाळेतून परत असताना घडल्या आहेत. शिक्षण संस्था व पालकांनी सजग रहाणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा