येत्या २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान भोपाळमध्ये होणाऱ्या बालवैज्ञानिकांच्या राष्ट्रीय परिषदेत राज्यातील ३० विज्ञानप्रकल्पांची निवड झाली असून यात मुंबईतील चार शाळांनी सादर केलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. ‘ऊर्जेचा शोध, संवर्धन’ ही यंदाच्या बालवैज्ञानिक परिषदेतील प्रकल्पाची मध्यवर्ती संकल्पना असून ऊर्जेचा स्रोत, ऊर्जा व्यवस्था, ऊर्जा आणि समाज, ऊर्जा आणि पर्यावरण, ऊर्जा व्यवस्थापन आणि संवर्धन आणि ऊर्जा विषयक योजना आणि मॉडेलिंग असे उपविषय निश्चित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती देताना बालवैज्ञानिक परिषदेचे राज्यस्तरीय सचिव आणि मुंबईतील प्रमुख समन्वयक बी. बी. जाधव म्हणाले की, मुंबई जिल्ह्य़ाच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पांमधून राज्यस्तरीय पातळीसाठी सुमारे ११ प्रकल्प निवडले गेले. अलीकडेच पुण्यातील शिरूर तालुक्यातील जातेगांव येथे झालेल्या परिषदेत राज्यस्तरासाठी निवडले गेलेले सुमारे ८० प्रकल्प सादर करण्यात आले. त्यातून राष्ट्रीय स्तरावर बालवैज्ञानिकांचे ३० प्रकल्प निवडले गेले. यात मुंबई विभागातील चार प्रकल्पांचा समावेश आहे.यात दहिसरच्या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचा सोलर ड्रायर हा प्रकल्प निवडला गेला असून प्रियांका गावडे ही विद्यार्थिनी गटप्रमुख आहे. निवडण्यात आलेला दुसरा प्रकल्प दादरच्या शिशू विहार शाळेच्या १० ते १३ वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा असून यात त्यांनी बहुउद्देशीय शेगडी बनवली आहे. तापलेल्या वाळूच्या सहाय्याने अधिक ऊर्जा खर्च न करता अन्न शिजण्यास कशी मदत होते, ते या प्रकल्पातून स्पष्ट केले आहे. प्रियांका चव्हाण ही या गटाची प्रमुख आहे. राष्ट्रीय स्तरासाठी निवडला गेलेला ‘एनर्जी फ्रॉम बायोमास’ हा तिसरा प्रकल्प चेंबूरच्या आदर्श विद्यालयाचा याच वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा आहे. नियती प्रेमराजन हिने या गटाचे नेतृत्त्व केले. निवडला गेलेला चौथा प्रकल्प अंधेरीच्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचा असून (लहान गट – १० ते १३) त्यांनी ‘सेव्हिंग एनर्जी विथ बर्निग लीड’ या विषयावर आपला प्रकल्प सादर केला होता. ऊर्जाबचतीवर आधारित अशा या प्रकल्पाच्या गटाचे नेतृत्त्व जितीश चव्हाण या विद्यार्थ्यांने केले.

Story img Loader