लहान आणि कुमार वयोगटातील मुलांसाठी परिकथा, जादूच्या गोष्टी आणि या विषयावरील पुस्तके आवडीची होती. मात्र काळ बदलला असून आता मुले आणि त्यांच्या पालकांकडून चरित्र, विज्ञान आणि पर्यावरणविषयक पुस्तकांना जास्त मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. सार्वजनिक आणि खासगी ग्रंथालयातील बालविभागालाउन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रंथालयांच्या ग्रंथपाल आणि कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सायबर कॅफेतील वाढती गर्दी, घरातील संगणक आणि त्यावर खेळले जाणारे गेम, भ्रमणध्वनीचा वाढता वापर यामुळे मुलांमधील वाचनाची आवड कमी होत चालली असल्याची ओरड ऐकू येते. असे असले तरी आजच्या पिढीनेही ‘वाचाल तर वाचाल’ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुस्तक प्रदर्शने आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ संस्थेचे लक्ष्मण राठीवडेकर यांनी हे निरिक्षण नोंदविले. राठीवडेकर यांनी सांगितले की, आत्ताच्या पिढीतील मुलांचे वाचन बदलले आहे. परिकथा, जादुच्या गोष्टी यापेक्षा आता चरित्र, विज्ञान, पर्यावरण आदी विषयांवरील विविध पुस्तके कुमार वयोगटातील मुलांकडून जास्त प्रमाणात वाचली जात आहेत. परिकथा, जादुच्या गोष्टी नाही म्हटले तरी खोटय़ा, काल्पनिक आहेत, याची जाणीव आता या मुलांना झाली आहे. वास्तव जीवनात ज्यांनी अथक परिश्रमातून उत्तुंग यश मिळविले, अशा मोठय़ा माणसांची चरित्रे मुलांना प्रेरणादायी वाटत आहेत. या पुस्तकांचा उपयोग त्यांना वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेसाठी तसेच स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासासाठीही होत आहे.
कुमार वयोगटापेक्षा लहान असलेल्या मुलांसाठी ‘चित्रमय गोष्टी’ आणि जादूच्या, परिक थांच्या पुस्तकांचे आकर्षण आजही आहे. पालक आणि मुले पुस्तक प्रदर्शन पाहायला येतात आणि मुलांसाठी त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करतात, असा आमचा अनुभव आहे. ‘अक्षरधारा’तर्फे आयोजित ‘बालकुमार शब्दोत्सव-वाचू आनंदे’ या उपक्रमासही विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे राठीवडेकर यांनी सांगितले.
वेगवेगळ्या ग्रंथालयातील बालविभागालाही उन्हाळी सुट्टीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुस्तके वाचण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक ग्रंथसंग्रहालयाचे सभासदत्व घेतले जात आहे. काही ग्रंथालयानी सभासद नसलेल्या मुलांसाठीही ग्रंथालयात बसून पुस्तके वाचण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथप्रदर्शने व पुस्तकांच्या दुकानातूनही लहान मुलांच्या पुस्तकांची चांगली खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे. दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक म्हणाल्या की, वाचनाची आवड आजच्या पिढीतही कायम आहे. ‘दासावा’चे सध्या सुमारे सव्वाशे ते दीडशे बाल सभासद आहेत. उन्हाळी सुट्टीमध्ये यात साधारण २० ते २५ नव्या सभासदांची भर पडते. या खेरीज १४ वर्षे वयोगटापर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दासावा’तर्फे गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी सुट्टीत एक आगळा उपक्रम राबवला जातो. मुलांनी वाचनालयात येऊन येथे बसून त्यांना हवी असलेली पुस्तके आम्ही वाचण्यासाठी मुलांना उपलब्ध करून देतो. यासाठी मुलांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या उपक्रमातही सध्या दररोज पाच ते दहा मुले सहभागी होत आहेत.
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या काजल पाटील यांनी सांगितले की, उन्हाळी सुट्टीत ग्रंथसंग्रहालयाच्याबालविभागाच्या सभासद संख्येत दरवर्षी काही प्रमाणात वाढ होते. आमच्या ग्रंथसंग्रहालयात स्वतंत्र बालविभाग असून तीन महिन्यांसाठी अवघे ९० रुपये शुल्क आम्ही आकारतो. या खेरीज जे ग्रंथालयाचे सभासद नाहीत, पण ज्यांना वाचनाची आवड आहे, अशा मुलांसाठी आम्ही २५ रुपये शुल्क घेऊन पुस्तक वाचण्याची सुविधा उपलब्ध करून देतो. अट एकच की मुलांनी ग्रंथालयात येऊन आणि तेथेच बसून पुस्तके वाचायची. किमान पन्नास मुलांना आम्ही या उपक्रमात सहभागी करून घेतो. १५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत हा उपक्रम चालविण्यात येतो. मुलांच्या वाचनाविषयीचे निरिक्षण नोंदविताना त्या म्हणाल्या की, सध्या ‘डायरी ऑफ व्हिम्पी’, ‘हॅरी पॉटर’, फास्टर फेणे (इंग्रजी अनुवाद) या पुस्तकांबरोबरच ‘इसापनीती’, ‘पंचतंत्र’ आदी जुनी पुस्तकेही अद्याप लोकप्रिय आहेत.
परीकथा आणि जादूच्या गोष्टीकडून मुले वळली चरित्र, विज्ञानाकडे!
लहान आणि कुमार वयोगटातील मुलांसाठी परिकथा, जादूच्या गोष्टी आणि या विषयावरील पुस्तके आवडीची होती. मात्र काळ बदलला असून आता मुले आणि त्यांच्या पालकांकडून चरित्र, विज्ञान आणि पर्यावरणविषयक पुस्तकांना जास्त मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आणखी वाचा
First published on: 19-04-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children turned to science from fairy tale and magic story