दहीहंडी उत्सवात १२ वर्षांखालील मुलांचा वापर करणाऱ्या गोविंदा पथकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने पोलिसांना दिल्यामुळे पथकांचे प्रमुख आणि प्रशिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. एकप्रकारे दहीहंडी उत्सवापूर्वीच आयोगाने पथकांची मटकी फोडली आहे. आयोगाच्या या निर्णयात सरकारने हस्तक्षेप करावा आणि पथकांना दिलासा द्यावा, अशी विनंती दहीहंडी उत्सव समन्वय समिती आणि गोविंदा पथकांकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी आदेश असला तरी मुलांचा सराव सुरूच राहील, अशी भूमिका गोविंदा पथकांनी घेतली आहे.
उंच दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी सर्वात वरच्या थरावर लहान मुलांना पाठविण्याची प्रथाच गोविंदा पथकांमध्ये पडली आहे. पाच-सहा वर्षांची मुले वजनाने हलकी असल्याने आठव्या, नवव्या थरांवर त्यांना पाठविले जाते. त्यासाठी त्यांच्याकडून एक-दीड महिना सरावही करून घेतला जातो. मात्र दहीहंडी फोडण्यासाठी रचलेला थर कोसळल्यानंतर सर्वात वर असलेल्या बाल गोविंदाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे १२ वर्षांच्या आतील मुलांना वर चढवूनये. दहीहंडीच्या दिवशी लहान मुले थरावर चढताना आढळल्यास संबंधित दहीहंडी पथकावर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने पोलिसांना दिले आहेत.
मात्र एक-दीड महिना सर्व गोविंदांकडून कसून सराव करून घेतला जातो. केवळ लहान मुलेच नव्हे तर कोणत्याच गोविंदांना दुखापत होऊ नये याची सवरेपरी काळजी घेतली जाते. गेल्या पाच वर्षांमध्ये दहीहंडी फोडताना एकाही लहान मुलाला दुखापत झालेली नाही, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. रुग्णालयाचेही अहवाल तपासून पाहिल्यास लहान मुलांना दुखापत झाल्याचे अभावानेच आढळेल, असे दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे बाळा पडेलकर यांनी सांगितले.
लहान मुलांना दहीहंडी उत्सवात बंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही आयोगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु आयोगाने आम्हाला बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. आमच्याविषयीचा निर्णय आमचे म्हणणे ऐकल्याशिवायच घेण्यात आला आहे. हा आदेश गोविंदा पथके आणि उत्सवावर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने या संदर्भात हस्तक्षेप करावा आणि पथकांना दिलासा द्यावा, अशी विनंती बाळा पडेलकर यांनी केली आहे.
आयोगाच्या आदेशाचा फटका सर्वच गोविंदा पथकांना बसणार आहे. मात्र बहुतांश गोविंदा पथकांनी सराव सुरू केला असून कोणत्याही परिस्थितीत त्यात खंड पडू दिला जाणार नाही. लहान मुलांचाही सराव करून घेतला जाईल, असे ठाम मत जय जवान गोविंदा पथकाचे सर्वेसर्वा डेविड अँथोनी फर्नाडिस यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा