एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांच्या जीवनातही बालदिनाचा आनंद यावा म्हणून येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा आणि यश फाऊंडेशन यांच्या वतीने पांडव लेणीजवळील जवाहरलाल नेहरू वनौद्यानात बालक व त्यांच्या पालकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात विविध खेळांच्या माध्यमातून मुलांनी आनंद लुटला. सुमारे २०० बालगोपाळांना या वेळी भेटवस्तू व खाऊ देण्यात आला. बाल मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे कमलाकर धोंगडे, आशा सबरवाल, नामदेव येलमामे, वन विभागाचे वनपाल आर. बी. तांबेकर, के. एस. इंगळे, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. या वेळी वनपाल तांबेकर यांनी उद्यानातील वनझाडे व औषधी वनस्पतीबद्दल माहिती दिली. धोंगडे यांनी सर्वाना बालदिनाचे महत्त्व पटवून दिले. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात केल्याचे अनुभव कथन केले. आपल्या आयुष्यातील दु:ख एकमेकांबरोबर वाटून त्यांनी मन मोकळे केले. या कार्यक्रमाचे आयोजन संगीता पवार, चंदा थेटे, सोनाली मोरे, छाया साबळे आदींनी केले.
‘अक्षरबंध’तर्फे मुलांना पुस्तकांचे वाटप
बालदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील अक्षरबंध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन आधाराश्रमातील चिमुकल्यांच्या हस्ते करण्यात आले. अक्षरबंधच्या विश्रामबाग येथील सभागृहात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास आधाराश्रमाच्या अधीक्षिका राधिका देशमुख, सहकारी पायल गौड, अक्षरबंधचे प्रवीण जोंधळे, सुरेश देशपांडे, अथर्व जोंधळे आणि रसिक उपस्थित होते. या वेळी बालगोपाळांना सुमेधा देशपांडे लिखित ‘छोटय़ांचे अंगण’ हा बाल काव्यसंग्रह तसेच अक्षरबंध प्रकाशनाची काही पुस्तके भेट देण्यात आली. आधाराश्रमच्या प्रियांका जेजूरकर, रुपाली तुरी, हिमांशी जंजाळकर आदी मुलींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कल्याणी देशपांडे-बागडे यांनी केले. आभार यतीन भानू यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा