अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत सातत्याने व्यावसायिक रंगभूमीवर बालनाटय़े सादर करणारी ‘चिल्ड्रेन्स थिएटर’ ही संस्था येत्या बालदिनी रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असून त्यानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात एक विशेष महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अ‍ॅनिमेशनपटनिर्मितीचा अनुभव असणाऱ्या चिल्ड्रेन्स थिएटरने पाव शतकाच्या या टप्प्यावर बालचित्रपटनिर्मितीची घोषणा केली आहे.
‘बच्चों के छोटे हाथों को चाँद सितारे छूने दो, चार किताबें पढम्कर वों भी हम जैसे हो जायेंगे..’ या भावनेने सातत्याने मुलांमधील कुतूहल, स्वप्नरंजन आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देण्याचे काम बालरंगभूमीने केले. देशभरात महाराष्ट्र वगळता अन्यत्र कुठेही व्यावसायिक बालरंगभूमी नाही. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरींनंतर राजू तुलालवार यांची चिल्ड्रेन्स थिएटर ही संस्था सातत्याने बालनाटय़े सादर करून महाराष्ट्रातील दोन पिढय़ांचे मनोरंजन करीत आहे.
सरकारी अनुदान नाही. बालनाटय़ आहे म्हणून थिएटरच्या भाडय़ामध्ये सवलत नाही. पुरस्कारांचे अमाप पेव फुटलेले असूनही बालनाटय़ या विभागासाठी कुठेही स्वतंत्र पारितोषिक नाही. अशा सर्वत्र प्रतिकूल परिस्थितीत दर सहा महिन्यांनी येणाऱ्या सुट्टीत नवनवी नाटके सादर करून ‘चिल्ड्रेन्स थिएटर’ने महाराष्ट्रात बालरंगभूमीची चळवळ जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या २५ वर्षांत या संस्थेने दोनअंकी १० बालनाटय़े आणि ६५ बालनाटिका मिळून ७५ बालनाटय़ांची निर्मिती केली. त्याचे व्यावसायिक बालरंगभूमीवर १५०० हून अधिक प्रयोग झाले आणि त्यात तीन हजारांहून अधिक बालकलावंतांनी विविध भूमिका केल्या.
सुधा करमरकरांपासून प्रेरणा
१९७९ मध्ये राजू तुलालवार यांनी ‘अशी कार्टी नको रे बाप्पा’ ही पहिली बालनाटिका लिहिली. त्यानंतर पुढील तीन वर्षांत त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या तीन बालनाटिकांनी अनेक आंतरशालेय स्पर्धामध्ये पारितोषिके मिळवली. बालनाटय़ातील त्यांची प्रगती पाहून सुधा करमरकर यांनी त्यांना या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा सल्ला दिला. सुरेश अंधारीकर या निर्मात्याने त्यांचे ‘चिंगू चिंगम, बबली बबलगम’ हे पहिले बालनाटय़ व्यावसायिक रंगभूमीवर आणले. आकांक्षा या नाटय़संस्थेबरोबर तीन वर्षे काम केल्यानंतर १४ नोव्हेंबर १९८८ मध्ये त्यांनी ‘चिल्ड्रेन्स थिएटर’ या नाटय़संस्थेची स्थापना केली.
एका तिकिटात तीन बालनाटय़े
एकाच तिकिटात तीन बालनाटय़े ही संकल्पना चिल्ड्रेन्स थिएटरने यशस्वी करून दाखवली. प्राणिनाटय़ ही कल्पनाही याच संस्थेने रंगभूमीवर साकार केली. ‘जादूचे घर’ या बालनाटय़ासाठी संस्थेने फिरता रंगमंच वापरला. फॅण्टसी, अद्भुतता, जादू, चमत्कार हे मुलांना आवडणारे सर्व प्रकार संस्थेने बालनाटय़ांद्वारे हाताळले. जोकर आणि जादूगार, रडका राक्षस, चेटकिणीची शाळा, भुताचा वाढदिवस, अदृश्य होणारा चिंटू, नाचणारे झाड, वाघोबाची दिवाळी, ससोबा काढतोय सिनेमा, हत्तीचे लग्न, टीव्हीवेडा वाघोबा, चॉकलेटखाऊ सिंहोबा, आईबाबा हरले, देव पावला, पप्पा-मम्मी भांडू नका आदी संस्थेची अनेक नाटके गाजली. बालनाटय़े सादर करण्याबरोबरच संस्था नियमितपणे प्रशिक्षण वर्गही आयोजित करते.
मनोरंजनाच्या महापुरात मुलांचे भावविश्व कोरडेच
सध्या टी.व्ही.वरील शेकडो वाहिन्यांवरून मनोरंजनपर कार्यक्रमांचा महापूर असला तरी त्यात खास मुलांसाठी अतिशय कमी प्रमाण असते. विविध स्पर्धात्मक कार्यक्रमात मुले मोठय़ांची गाणी म्हणतात किंवा केवळ प्रौढांसाठीच असलेल्या गाण्यावर नाच करतात. कारण गेल्या काही वर्षांत सलील कुलकर्णी-संदीप खरे असे काही मोजके अपवाद वगळता खास मुलांसाठी अशी कुणी फारशी गाणी केलीच नाहीत. हिंदीत तर ‘लकडम्ी की काठी’, ‘घने जंगलो में’, किंवा फार फार तर ‘जंगल जंगल पता चला है’ एवढेच आठवते. खरेतर इतर खेळांप्रमाणेच नाटक खेळणे हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे त्याचा क्रमिक अभ्यासक्रमात समावेश व्हावा, असे मत राजू तुलालवार यांनी व्यक्त केले आहे. अलीकडच्या काळात बालनाटय़ांसाठी मुलींच्या तुलनेत मुलांचा ओढा कमी होऊ लागला आहे. पूर्वी नाटय़क्षेत्रात मुलींना मज्जाव होता. त्यामुळे पुरुषच स्त्री पार्ट करीत. आता नेमकी उलट परिस्थिती असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.
काळानुरूप बदल
बालनाटय़ांविषयी रुची कमी होण्यास टी.व्ही.वरील कार्टून्स मालिकाही कारणीभूत आहेत. त्यामुळे त्या माध्यमातही काहीतरी सकस देण्याच्या हेतूने ‘चिल्ड्रेन्स थिएटर’ने ‘पैसों का पेडम्’ आणि ‘रोनेवाला राक्षस’ या दोन अ‍ॅनिमेशनपटांची निर्मिती केली. ‘बूमबूम चिकी बूम’ ही लहान मुलांच्या गाण्यांची सीडी प्रकाशित केली. आता लवकरच बालचित्रपट निर्मिती करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा