डोरेमॉन, टॉम अ‍ॅण्ड जेरी, निंजा हातोरी, डोरा, शिनचान आदी  कार्टूनचा जमाना, इंग्रजी माध्यमातून शिकण्याकडे वाढलेला कल आणि विभक्त कुटंब पद्धतीमुळे आताच्या पिढीतील लहान मुलांवर ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’, ‘जॉनी जॉनी येस पप्पा’ अशीच गाणी कानावर पडत आहेत. आपल्या बालपणात पाठ केलेली, ऐकलेली आणि आपल्या संस्कृतीतील गाणी आज लोप पावत चालली आहेत. याच बडबड गाण्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा आगळा प्रयत्न ‘मोरया प्रकाशना’ने केला आहे.
इंग्रजी भाषेत लहान मुलांसाठी अशा प्रकारची अनेक पुस्तके आहेत. आकर्षक मांडणी व सजावट, लहान मुलांना सहज वाचता येईल, अशी मोठी अक्षरे आणि भरपूर रंगीत चित्रे असलेली ही पुस्तके लहान मुलांबरोबरच मोठय़ानाही आकर्षित करून घेत आहेत. मराठीत काही अपवाद वगळता अशी पुस्तके खूप मोठय़ा प्रमाणात उपलब्ध नाहीत. मोरया प्रकाशनाने ‘चिमणगाणी’ या नावाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाने ही उणीव भरून निघाली आहे. बदलत्या जीवनशैलीत विस्मृतीत गेलेली आणि हळूहळू लोप पावत चाललेली अनेक बडबड गीते, बालगीते, प्रार्थना यांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.झपाटय़ाने बदलणाऱ्या आजच्या परिस्थितीत लहान मुलांनी प्रार्थना, बडबडगीते ऐकावीत, पाठ करावीत, शब्दसंग्रह वाढवावा, आई-बाबांनी आपल्या मुलांना ही गाणी वाचून, गाऊन दाखवावीत या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आल्याचे सुरेखा दीक्षित यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. तर आपल्या संस्कृतीतील लोप पावत चाललेली ही बडबड गीते अक्षय टिकून राहावीत आणि त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, त्यासाठी आम्ही हे पुस्तक आवर्जून प्रकाशित केल्याचे मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन यांनी सांगितले.
३२ पानाच्या या पुस्तकात जवळपास ५० बडबड गीते संकलित करण्यात आली असून यात गणपती, चिऊताई, कावळेदादा, छोटे बाळ, मनीमाऊ, पोपट, आई, हत्ती, विदूषक, भोपळा, भिंगरी, शाळा, आजोबा, ताशा, ढोल, फुगा, बाहुली, फुले, गुलाब, मोर, घोडा, घर आणि लहान मुलांच्या भावविश्वाशी निगडीत अनेक कविता, गाणी, बडबड गीते यांचा समावेश आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, आतील चित्रे आणि सजावट अशोक बोकील यांनी केली आहे. प्रत्येक पानावर त्या त्या कवितेला साजेशी रंगीत छायाचित्रे, ठळक व मोठी अक्षरे आणि संपूर्ण रंगीत छपाई हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.

Story img Loader