हिंगोली जिल्हा परिषदेतील नोकरभरती काही ना काही कारणाने नेहमीच वादग्रस्त ठरली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी नोकरभरतीत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला खरा. पण कनिष्ठ यांत्रिकीपदाच्या भरतीसाठी अपात्र उमेदवारांनीच परीक्षा दिल्याचे बिंग फुटले. अजून त्याचा निकाल जि. प. प्रशासनाला जाहीर करता आला नाही.
हिंगोली जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यानंतर जि. प. ची नोकरभरती प्रक्रिया चांगलीच गाजली. तत्कालीन जिल्हाधिकारी ओ. एस. गुप्ता यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी झाल्या. या भरती प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी बाजीराव जाधव यांच्या काळातील नोकरभरतीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी खिल्लारे यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल होऊन ही भरती प्रक्रिया रद्द झाली. जिल्हाधिकारी विनिता सिंघल यांच्या काळातील भरती प्रक्रियाही चांगलीच गाजली. लेखी परीक्षेचे गुण जाहीर होण्यापूर्वीच यादी बाहेर गेल्याने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय तत्कालीन विभागीय आयुक्तांनी घेतला होता. या वेळी जि. प. च्या बांधकाम विभागातील कनिष्ठ यांत्रिकीपदाच्या एका जागेसाठी अर्ज मागविले होते. या निमित्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत उमेदवाराला किमान पाच वर्षांचा कामाचा अनुभव बंधनकारक असल्याची अट होती. मात्र, अटीप्रमाणे आलेल्या ७ उमेदवारी अर्जामधून एकही उमेदवार पात्र नव्हता, तरीही जि. प. प्रशासनाने २ जून रोजी या जागेसाठी लेखी परीक्षा घेतली. सातपैकी पाच उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, या पाचपैकी एकाही उमेदवाराकडे पाच वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र नसल्याचे परीक्षेनंतर प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे जि. प. प्रशासनाने परीक्षेचा निकाल जाहीर केला नाही. सोमवारी निकाल जाहीर होणे आवश्यक होते. या प्रकाराची आता उलटसुलट चर्चा रंगली आहे.

Story img Loader