बच्चेकंपनीला धम्माल हसवणारा आणि हसता हसता काहीतरी शिकवणारा ‘चिंटू’ वर्तमानपत्रातून मोठय़ा पडद्यावर आल्याच्या घटनेला एप्रिलमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. याच निमित्ताने ‘इंडियन मॅजिक आय मोशन्स’ पुन्हा एकदा ‘चिंटू’ची गोष्ट मोठय़ा पडद्यावर घेऊन येत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आपल्या कॉलनीतच मस्ती करणारा आणि धम्माल उडवून देणारा चिंटू या चित्रपटात कॉलनीबाहेर एक साहस करणार आहे.
कॉलनीतील आपले हक्काचे मैदान बळकावणाऱ्या एका दादाला चिंटू आणि त्याच्या दोस्तांनी मिळून ‘चिंटू’च्या पहिल्या चित्रपटात चांगलाच धडा शिकवला होता. यातील १४ पायांचा ड्रॅगन आणि चायनिजच्या गाडीवरच्या दादाची ‘ह्य़ाँग मिंग सलाँग’ ही आरोळी चांगलीच गाजली होती. बच्चेकंपनीने चिंटूचे हे कारनामे डोक्यावर घेतले होते. वर्तमानपत्रात तीन चार चौकटींत व्यक्त होणारे लहान मुलांचे भावविश्व आपण या चित्रपटाच्या माध्यमातून मोठय़ा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता, असे श्रीरंग गोडबोले यांनी त्या वेळी सांगितले होते.आता एप्रिल महिन्यात मोठय़ा पडद्यावरचा चिंटू पुन्हा एकदा लहानग्यांना भेटायला येणार आहे. या वेळी चिंटू आपल्या कॉलनीत धम्माल उडवणार नाही. तर चिंटू कॉलनीबाहेर एका जंगलात आपली कमाल दाखवणार आहे, अशी माहिती ‘आयएमई मोशन्स’च्या सुहृद गोडबोले यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना दिली. या चित्रपटाचा काही भाग नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतच्या स्टुडियोत चित्रित झाला असून पुढील भाग पुण्यातील मुळशी भागात चित्रित होईल, असेही त्यांनी सांगितले. लहान मुलांचे भावविश्व रेखाटणारे, त्यांना समजतील असे चित्रपट मराठीत खूपच कमी बनतात. मात्र त्यांच्यासाठीही चित्रपट बनवले गेले पाहिजेत. ‘चिंटू’च्या पहिल्या गोष्टीला लहान मुलांनी दिलेला प्रतिसाद पाहूनच आम्ही या नव्या गोष्टीची सुरुवात केली आहे. तसेच दर उन्हाळ्याच्या सुट्टीत चिंटूची एक नवीन गोष्ट मुलांपुढे आणण्याचा आमचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा