डोंबिवलीजवळील आजदेपाडा गावात नऊ जणांच्या एका गटाने गावातील मोलमजुरी, कष्टकरी गटातील पन्नास महिलांची भिशीच्या माध्यमातून ३३ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या गोसावी नावाच्या व्यक्तीच्या घराबाहेर नागरिकांनी सकाळापासून पैसे परत मिळविण्यासाठी गर्दी केली आहे.
प्रकाश मच्छिंद्र गोसावी, प्रतिभा प्रकाश गोसावी, वैभव प्रकाश गोसावी, अनुराधा संभाजी गोसावी, अनिल संभाजी गोसावी, नीलेश संभाजी गोसावी, शीतल अनिल गोसावी, रंगनाथ गोसावी, मंदा रंगनाथ गोसावी अशी आरोपींची नावे आहेत. फसवणूक झालेल्या आजदे गावातील वैशाली भोसले या शिवणकाम करणाऱ्या महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात तक्रार केली आहे. आजदे गावातील मजूर, कष्टकरी गटातील महिला गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून गोसावी कुटुंबीयांच्या सहकार्याने भिशीचे पैसे जमा करतात. प्रत्येक गुंतवणूकदार महिलेने आपला गट तयार केला होता. दर महिन्याला गुंतवणूकदारांमार्फत पाच लाख रुपयांची रक्कम जमा होत होती. या रकमेत आरोपी प्रतिभा गोसावी १ लाख ८३ हजार २७० रुपये भरणा करीत होती. मागील आठ महिन्यांपासून प्रतिभा यांच्यासह इतर आठ आरोपींनी भिशीची १५ लाख ५७ हजार रुपयांची रक्कम भरणा केली नाही.
त्यामुळे काही लाभार्थी गुंतवणूकदार महिलांना त्यांची भिशीचा परतावा मिळाला नाही. गोसावी कुटुंबीयांकडे पैशाची वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडून शिवीगाळ, मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने गुंतवणूकदार महिलांनी गोसावी यांच्याविरोधात ३३ लाख ५७ हजार रुपये फसवणुकीचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पढार तपास करीत आहेत.