ए ट्रिब्यूट टू यश चोप्रा  
प्रेमाच्या त्रिकोणाच्या प्रेमात पडलेले यशस्वी निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा डेंगू तापाचे निमित्त होऊन २१ ऑक्टोबरला अचानक काळाच्या पडद्याआड गेले. ‘वीर-झारा’नंतर आठ वर्षांनी ‘जब तक है जान’ या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात उतरले होते. हा आपला शेवटचा चित्रपट, असं त्यांनी जाहीरही केलं होतं. दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या बहुतांश चित्रपटांतील प्रेमकथा तर्कविसंगत होत्या, तरीही अवीट गोडीची गाणी आणि नयनरम्य छायाचित्रण ही त्यांच्या चित्रपटांची ओळख होती. त्यांना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी सारेगम इं. लि.ने ‘ए ट्रिब्यूट टू लिजेंडरी प्रोडय़ूसर अँड डायरेक्टर यश चोप्रा’ हा अल्बम रसिकांपुढे ठेवला आहे.
दोन सीडींच्या या संचाच्या पहिल्या सीडीत १५ तर दुसऱ्यात १३ गाणी आहेत. ‘धूल का फूल’ या चित्रपटातील ‘धडकने लगे बेकरारों की दुनिया’ या सदाबहार गीताने या अल्बमची सुरुवात होते. तुम्हारी आँखे (धरमपुत्र), ए मेरी जोहरजबीं (वक्त), अब चाहे माँ रुठे या बाबा (दाग), कभी कभी (शीर्षक गीत), क्या मौसम है (दुसरा आदमी), मोहब्बत बडे काम की (त्रिशूल), देखा एक ख्वाब (सिलसिला) या गाण्यांचा समावेश आहे. दुसऱ्या सीडीमध्ये बदलत्या काळातील बदलत्या संगीताचं प्रतिबिंब उमटलं आहे. आजा रे (नूरी), जिंदगी आ रहा हू मै (मशाल), मेरे हाथोंमे नौ नौ चुडियाँ है (चांदनी), तुझे देखा तो ये (दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे), जादू तेरी नजर (डर), दिल तो पागल है (शीर्षक गीत), हम को हमीसे चुरा लो (मोहोब्बतें) आदी गाणी यात ऐकण्यास मिळतात.
यश चोप्रा यांना गाण्याचा कान आणि काव्याची जाण असल्याने (लता मंगेशकर व साहिर लुधियानवी ही त्यांची श्रद्धास्थानं, तसंच पहाडी हा त्यांचा आवडता राग) प्रस्थापित संगीतकारांपेक्षा नेहमीच वेगळ्या संगीतकारांना त्यांनी प्राधान्य-प्रोत्साहन दिलं. खय्याम यांच्या कारकीर्दीची दुसरी खेळी ‘कभी-कभी’मुळे सुरू झाली, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. याशिवाय शिव-हरी ही जोडी जमवण्याची कल्पकताही यश चोप्रांनी दाखवली. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून आधुनिक धाटणीचे संगीत (मशाल) मिळवण्याची किमयाही त्यांनी साधली. अनेक दिग्गज संगीतकारांकडे साहाय्यक संगीतकार या नात्याने काम करताना असंख्य गाजलेल्या गाण्यांमध्ये सिंहाचा वाटा असलेले उत्तम सिंग यांनाही त्यांनीच पहिला मोठा ब्रेक (दिल तो पागल है) दिला. यश चोप्रांमुळे हिंदी चित्रपट संगीत अधिक संपन्न झालं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आनंदमूर्ती
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांसाठी पर्वणी ठरेल, असा ‘आनंदमूर्ती’ हा नवा अल्बम तुलसी विलास बुरांडे यांनी मथुराबाई गजानन बुरांडे यांच्या स्मरणार्थ प्रस्तुत केला आहे. यात एकूण नऊ रचना असून त्यातील चार गीते मंदार पारखी या प्रतिभावान तरुण संगीतकाराने, तर दोन गीतांना प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी यांनी संगीतबद्ध केली आहेत. उर्वरित संगीतरचना पारंपरिक आहेत.
यमन रागातील ‘नि:शंक हो’ या तारकमंत्राने या अल्बमची सुरुवात होते, पद्मजा फेणाणी यांनीच त्यास स्वरांचा व सुरांचा साज चढवला आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले ‘नाही जन्म नाही नाम’ हे गीतही श्रवणीय आहे.
मंदार पारखी यांनी संगीतबद्ध केलेलं ‘अक्कलकोटी ध्यान लागले’ हे गीत विशेष जमून आलं आहे. हे गीत पद्मजा फेणाणी यांनी गायलं आहे. (गीतांच्या सूचीत या गीतापुढे पद्मजा यांच्यासह मंदारचंही नाव आहे, मात्र ते केवळ पद्मजांच्या आवाजात ऐकू येतं!) पद्मजा, मंदार व मनोज देसाई यांच्या स्वरातील ‘आनंदाची मूर्ती’ या गीतातूनही भक्तीचा उत्तम आविष्कार घडला आहे. ‘स्वामी नाम कंठी धरावे’ (मंदार) तसंच त्यानंतरचं मालकंस रागातील ‘पतित मी पापी’ (मनोज) या गीतांमुळे या अल्बमचा आलेख उंचावतो. मनोज देसाई यांच्या गायकीवर पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीची बरीच छाप असल्याचं जाणवतं.
अर्थात त्यांच्या आवाजाची केवळ नक्कल न करता त्यांनी पंडितजींचं गाणं पूर्णपणे आत्मसात केल्याचंही दिसतं, हे विशेष. नामजप आणि समर्थाच्या आरतीनंतर ‘तू माझा यजमान रामा’ (पद्मजा) या तोडी रागातील गीताने या अल्बमची सांगता होते.
पद्मजा फेणाणी यांनी नेहमीच्या सहजतेने त्यांच्या वाटय़ाच्या रचना सादर केल्या आहेत.
या अल्बमच्या निमित्ताने मंदार पारखी हा तरुण संगीतकार संगीतसृष्टीला गवसला आहे, हे निश्चित. त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. या गीतांचे संगीत संयोजन प्रसिद्ध बासरीवादक विजू तांबे यांनी केलं असल्याने प्रत्येक गीतात बासरीचे सूर प्रभावीपणे रुंजी घालतात. ही सर्व गीते ऐकताना एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्याचा आभास निर्माण होतो. गायक-वादक-संगीतकार या सर्वाचेच हे एकत्रित यश आहे.
(समीक्षणासाठी सीडी-डीव्हीडी आमच्या नरिमन पॉइंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.) 