अनंत चतुर्दशीला श्रीगजाननाचे विसर्जन झाल्यानंतर पूर्वी नवरात्राचे वेध लागत. आजकाल परिस्थिती बदलली आहे. आता साखरचौथीचा म्हणजे गौरा गणपतीही (राजकारण्यांच्या कृपेने सार्वजनिक मंडळे श्रीमंत झाल्याने) वाजतगाजत येऊ लागला आहे. साहजिकच गणेशोत्सवाचा कालावधी पूर्वीपेक्षा लांबला आहे. याची दखल घेत कॅसेट कंपन्यांकडून गणेशगीतांच्या नवनवीन सीडीज दाखल होत आहेत. टाइम्स म्युझिकने अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती या दोन अनुभवी गायिकांचे स्वतंत्र अल्बम गणेशभक्तांसमोर ठेवले आहेत. अनुराधा यांच्या आवाजातील श्रीसिद्धिविनायक महाआरती या अल्बममध्ये काकड आरतीपासून शेजआरतीपर्यंतच्या पारंपरिक २० आरत्या ऐकण्यास मिळतात. अतिशय गोड आवाज आणि स्वच्छ-स्पष्ट उच्चार ही या गायिकेची वैशिष्टय़े यातही आढळतात. अथर्वशीर्ष आणि मंत्रपुष्पांजलीचाही या अल्बममध्ये समावेश आहे. अरुण पौडवाल आणि अनुराधा यांचा मुलगा आदित्य याने या आरत्यांचे नेटके संगीत संयोजन केले आहे.
आदि शंकराचार्याच्या दैवी प्रतिभेतून साकारलेल्या श्रीगणेश स्तवनाच्या रचना आदि गणेश या अल्बममध्ये ऐकण्यास मिळतात. ‘गणेश पंचरत्नम आणि गणेश भूजंगम’ या संस्कृत रचना कविता कृष्णमूर्ती यांनी समर्थपणे गायल्या आहेत. चित्रपटगीतांत त्यांना अनेकदा फार वरच्या पट्टीत गावं लागतं, येथे मात्र या गुणी गायिकेचा खर्जातील स्वर कमालीचा कर्णमधूर वाटतो. यातील ‘जय जय सूरवरपूजीता आणि ओम गणेश नम:’ या रचनाही त्यांनी उत्तमरित्या गायल्या आहेत. या सर्व रचना संस्कृतमधील असल्याने पवित्र वातावरणाची सहज निर्मिती होते. या अल्बमचे वैशिष्टय़ म्हणजे डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे संगीत! कविता कृष्णमूर्ती यांचे पती असणारे सुब्रमण्यम व्हायोलीन वादनात जागतिक पातळीवर ख्यातनाम आहेत. आदि शंकराचार्याच्या या कालातीत रचनांना त्यांनी त्याच तोडीचे संगीत दिले आहे. हे कमी म्हणून या प्रत्येक रचनेत त्यांच्या व्हायोलिनचा बो सफाईने फिरला आहे.
कविता आणि सुब्रमण्यम यांच्या बिंदू, नारायण आणि अंबी या मुलांनी तसेच प्रिया आहलावत यांनी या अल्बममध्ये सहगायन केले आहे.     
(समीक्षणासाठी सीडी-डीव्हीडी आमच्या नरिमन पॉइंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)

Story img Loader