बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची हाताळणी असणाऱ्या ‘जरा हटके’ चित्रपटांची संख्याही वाढतेय आणि चित्रपटांमध्ये विषयांचे वैविध्यही येतेय, ही चांगलीच बाब आहे. अतिमनोरंजनाच्या आजच्या काळात आणि वाढत्या शहरीकरणाच्या काळात आणि नवनवीन तंत्रज्ञान येत असल्यामुळे माणसाला तोचतोचपणाचा खूप कंटाळा येतो. चित्रपटांमध्येही तोच तोच मसाला आणि कथानके पाहण्याचाही कंटाळा येतो. त्यामुळे कथानक जुने आणि हाताळणी नवी, वैशिष्टय़पूर्ण असली तर नावीन्यपूर्ण अनुभव प्रेक्षकाला मिळताना दिसतो. रीमा कागती यांचा हा चित्रपट मात्र कथानकही वेगळे, त्याची हाताळणीही वेगळी आणि पटकथेची अप्रतिम गुंफण आणि वैशिष्टय़पूर्ण सादरीकरण यामुळे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाय.
चित्रपटाच्या शीर्षकावरून ‘मर्डर मिस्टरी’ किंवा आमिर खान पोलीस दाखवलाय हे आधीच माहीत असल्यामुळे ‘सरफरोश’मधील कथानकासारखे काही असेल, असा अंदाज बांधून प्रेक्षक चित्रपटाला जातो; परंतु तद्दन पोलिसी कथा, अंडरवर्ल्डचे जगत यापेक्षा संपूर्णपणे वेगळी आणि तितक्याच वैशिष्टय़पूर्ण सादरीकरणातून चित्रपटाची गोष्ट पडद्यावर उलगडताना पाहत असताना प्रेक्षक खिळून राहतो, गुंगून जातो, विचार करीत राहतो.
सुरजनसिंग शेखावत (आमिर खान) हा मुंबई पोलीस दलातला एक अधिकारी असतो. वरळी सी फेसवर मोटारचा अपघात होऊन मोटार समुद्रात पडते आणि गाडी चालवत असलेला अभिनेता अरमान कपूरचा मृत्यू होतो. मध्यरात्री घडलेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सकाळी पोलीस अधिकारी शेखावत तिथे पोहोचतो. गाडी समुद्रातून बाहेर काढली जाते, चौकशी सुरू होते. इतका भयानक अपघात कसा काय झाला, याचा विचार करताना शेखावतला हत्येचा संशय येतो आणि हत्या की अपघात, याचा थांग लावताना संबंधित गुन्हेगारांचा शोध लावण्याचा प्रयत्न तो करतो. त्यात त्याला रोझी (करीना कपूर) ही वेश्या मदत करते. गोष्ट सरळसाधी आहे; परंतु शेखावतच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनेची उकल आणि अपघात की हत्या याची उकल अशा दोन पातळ्यांवर शेखावतचा शोध एकाच वेळी सुरू राहतो, त्यातून त्याला काही गोष्टी गवसतात, त्याचा अर्थ लावण्याचा तो प्रयत्न करीत राहतो. माणसाच्या आयुष्यातील अनाकलनीय, अचंबित करणाऱ्या घटना, आपले माणूस सोडून गेल्याचे दु:ख, ज्या गोष्टींवर, घटनांवर माणसाचे नियंत्रण नसते, त्याविषयी त्याला कुतूहलही असते आणि खंतही असते. याच मध्यवर्ती कल्पनेवर दिग्दर्शिकेने पटकथेची गुंफण अशा पद्धतीने केली आहे की पडद्यावर दिसणारे कोडे आणि त्याची उकल यात प्रेक्षक शेवटपर्यंत गुंतून जातो. पटकथा-दिग्दर्शनाबरोबरच समर्पक छायालेखन यामुळेही सुरजनसिंग शेखावतला पडलेले कोडे आणि ते उलगडण्यासाठी चाललेली त्याची धडपड याच्याशी प्रेक्षक तादात्म्य पावतो.
सुरजनसिंग आणि रोशनी अर्थात आमिर आणि राणी मुखर्जी यांच्यातले नवरा-बायकोचे नाते, सात-आठ वर्षांचा त्यांचा मुलगा करण याच्या मृत्यूनंतर कसे बदलते याची झलक पडद्यावरील त्यांच्या पहिल्या दर्शनातून दिग्दर्शिकेने करून दिली आहे. नवरा-बायकोच्या या बदललेल्या नात्यामुळे दोघांच्या वागण्यात आलेला अबोलपणा तरीही त्या अबोलपणातून, एकमेकांकडे पाहण्यातून व्यक्त होणारे भाव प्रेक्षकांपर्यंतही सहजपणे पोहोचतात. अरमान कपूर या अभिनेत्याचा विचित्र अपघात आहे की हत्या आणि आपला मुलगा करण याचा बुडून मृत्यू का झाला, अशा दोन प्रश्नांची उत्तरे शोधताना शेखावतची दमछाक होते, त्याचा गोंधळ उडतो, असे आपल्याच बाबतीत का होतेय याची टोचणी, मुलाचा मृत्यू आपल्यामुळे झाला हा मनातला सल अतिशय परिणामकारक पद्धतीने पडद्यावर पाहताना प्रेक्षक हरखून जातो, शेखावतबरोबर प्रेक्षकही तितकाच अचंबित होतो आणि शेखावतच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा मनातल्या मनात संबंध लावत राहतो आणि एकाच वेळी पडद्यावर दाखविण्यात येणारी घटना, त्याची उकल करण्याचा प्रयत्न, उकल करताना शेखावतच्या वैयक्तिक जीवनातील घटना आणि ते दोन्ही पाहत असताना प्रेक्षक आठवत असलेल्या स्वत:च्या आयुष्यातील घटना अशा तीन पातळींवर प्रेक्षक विचार करत करत चित्रपट पाहतो. अर्थात चित्रपट पाहताना प्रेक्षकाचे रंजनही नक्कीच होते. आमिर खान, राणी मुखर्जी यांचा अभिनय भावतो. तैमूर या भूमिकेद्वारे नवाझुद्दिन सिद्दिकीनेही धमाल आणली आहे. त्याने अलीकडेच साकारलेली ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील भूमिका आणि अभिनय याची अजिबात आठवण होणार नाही, याची काळजी दिग्दर्शिकेने नक्कीच घेतली आहे. चित्रपट संपताना वर्तुळ पूर्ण झाल्याचे समाधान प्रेक्षकाला मिळते, परंतु हा अनुभव अस्वस्थ करणारा ठरतो.
तलाश
निर्माते – रितेश सिधवानी, आमिर खान, फरहान अख्तर, दिग्दर्शन – रीमा कागती, कथा-पटकथा – रीमा कागती, झोया अख्तर, संवाद – फरहान अख्तर, अनुराग कश्यप, छायालेखन – मोहानन, संकलन – आनंद सुबाया, संगीत – राम संपत, कलावंत – आमिर खान, करीना कपूर, राणी मुखर्जी, नवाझुद्दीन सिद्दिकी, शेरनाझ पटेल, विवान भटेना, परिवा प्रणाती व अन्य.

Story img Loader