शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका मोठय़ा घटकाला शिक्षणाचा हक्क देणाऱ्या ‘नाईट स्कूल’वरील हा चित्रपट नक्कीच एकदा तरी पाहावा असा आहे. पण कृष्णा आणि देशपांडे सर यांच्यातील अनोखं नातं दाखवण्याच्या नादात मूळ ‘नाईट स्कूल’चा विषय बाजूला राहतो आणि हीच या चित्रपटाची शोकांतिका ठरते…
मराठी चित्रपटसृष्टी सध्या (म्हणजे गेल्या काही वर्षांपासून) एका सुंदर काळातून चालली आहे. जनसामान्यांशी निगडीत अनेक हटके विषय, जे वैश्विक पातळीवरही लोकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतात, मराठीत सहजपणे मांडले जात आहेत. अशा विषयांवर चित्रपट करण्याचं धाडस निर्माते दाखवत आहेत, ही यातील सर्वात चांगली गोष्ट! पण एवढं चांगलं वातावरण असूनही मराठी चित्रपटांच्या बाबतीत ‘आहे मनोहर तरी, गमते उदास’ असंच म्हणावं लागतंय. वैश्विक पातळीवर भिडणारे विषय निवडूनही त्या विषयांची हाताळणी चुकल्यामुळे हे विषय आणि पर्यायाने चित्रपट भरकटल्याची उदाहरणं मराठीत अनेक आहेत.
याच गोष्टीचं ताजं उदाहरण म्हणजे ‘नाईट स्कूल’ हा चित्रपट! अनेक शहरांमध्ये कष्टकरी घरातील मुलांच्या शिक्षणासाठी नाईट स्कूल किंवा रात्रशाळा ही संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. मुंबईतही अशा अनेक शाळा आहेत. या शाळेतील मुलांच्या, शाळेच्या समस्या आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न, हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. सुरुवातीला हा पारा दिग्दर्शक मानसिंग पवार यांनी अतिशय उत्तमपणे पकडला आहे. त्यामुळे सुरुवातीला हा चित्रपट खूप मोठी मजल मारणार, असं वाटतं. पण हळूहळू प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो. पण तरीही हा चित्रपट दोन तास खिळवून ठेवतो, हेदेखील तेवढंच खरं.
मुंबईच्या एका झोपडपट्टीतील ‘शिवाजी नाईट स्कूल’ची ही गोष्ट आहे. या शाळेचे संचालक अण्णा फडतरे (प्रसाद पंडित) हे अतिशय कर्तव्यकठोर आणि निस्पृह शिक्षक आणि संचालक आहेत. आपली शाळा ही कष्टकरी मुलांपर्यंत शिक्षणाचे ‘जीवन’ पोहोचवणारी गंगा आहे, असं त्यांचं मत आहे. पण शाळेपुढील समस्यादेखील त्यांच्या तळमळीएवढय़ाच प्रचंड आहेत. सरकारी अनुदानाअभावी या शाळेला पैशांची समस्या भेडसावत आहे. त्याचबरोबर पुरेशा तळमळीने न शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे आणि तळमळीने न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शाळेचा निकाल दरवर्षी २० ते ३० टक्के एवढाच लागतो, यामुळेही अण्णा व्यथित आहेत. शाळेने विजेचं बिल न भरल्याने महावितरण शाळेची वीज कापतं. त्यावेळी अण्णा पदरचे १५ हजार रुपये भरून वीज पुरवठा सुरू करतात. त्यानंतर ते मंत्रालयात सचिवांची भेट घेतात त्याहीवेळी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. त्यातच वस्तीत दारूचा गुत्ता चालवणारा भाई (श्रीकांत यादव) हादेखील ध्वनिक्षेपकावर गाणी लावून, मुलांना जुगाराच्या नादी लावण्याचा प्रयत्न करून अण्णांच्या शाळेत अडथळा आणत असतो. यामुळे व्यथित झालेले अण्णा ब्रिलियन्स स्कूलच्या सत्कार समारंभात पोहोचतात. तेथे देशपांडे सरांचा (संदीप कुलकर्णी) सत्कार होत असतो आणि त्यांना द्रोणाचार्य, ज्ञानेश्वर आदींच्या उपमाही दिल्या जात असतात. त्यावेळी सात्विक संतापापोटी अण्णा, देशपांडे सरांना ‘नाईट स्कूल’च्या विद्यार्थ्यांना शिकवून शंभर टक्के निकाल लावून दाखवा, असं आव्हान देतात.
देशपांडे सर एका मोठय़ा शाळेतली नोकरी सोडून नाइट स्कूलमध्ये शिकवतात का, हे आव्हान ते कसं पेलतात, आव्हान स्वीकारल्यानंतरच्या अडचणींचा सामना ते कसा करतात, आदी प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘नाईट स्कूल’ बघितला पाहिजे. या चित्रपटाचे संवाद चमकदार झाले आहेत. अण्णा फडतरे यांचं पात्र लेखकाने खूपच चांगल्या पद्धतीने उभं केलं आहे. ‘पैशांच्या थैल्यांनी शिक्षणाची गंगा गरिबाच्या दारात जाण्यापासून अडवू नका’, ‘अंधारात राहिल्याशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही,’ हे आणि यासारखे अनेक चांगले संवाद चित्रपटात जागोजागी आहेत. त्याचबरोबर चित्रपटात असलेलं एकमेव गाणंदेखील खूपच चांगलं लिहिलं आहे. या गाण्याच्या शब्दांतूनही चित्रपटाचा आशय ठळकपणे स्पष्ट होतो. दिग्दर्शक मानसिंग पवार यांनी या चित्रपटाला वास्तवदर्शी ट्रिटमेण्ट दिली आहे. नाईट स्कूल, त्यातील वर्ग, वस्ती या सर्वच जागांचा खूप चांगला वापर दिग्दर्शकाने केला आहे. त्याचबरोबर लाइट्सचा योग्य वापर करूनही पवार यांनी योग्य परिणाम साधला आहे. देशपांडे सर अण्णांना पहिल्यांदा रात्रशाळेत भेटायला येतात त्यावेळी अण्णा आपल्या कोटाचं पेन काढून त्यांना देतात, या प्रसंगातून दिग्दर्शक खूप काही सांगून गेला आहे.
चित्रपटात अनेक प्रसंगांमध्ये पवार यांचं दिग्दर्शकीय कौशल्य ठायी ठायी दिसून येतं. तरीही हा चित्रपट आणि त्याचा विषय (पटकथा, संवाद वगैरे त्यांचेच असूनही) त्यांच्या हातून निसटल्यासारखा वाटतो. हा चित्रपट प्रसाद पंडित आणि संदीप कुलकर्णी या दोघांच्या अभिनयासाठी नक्कीच पाहायला हवा. प्रसाद पंडित यांचं काम ‘साद’ या चित्रपटातील अनाथाश्रम चालकाच्या त्यांच्या भूमिकेची आठवण करून देणारं असलं, तरी या चित्रपटात त्यांना शंभर टक्के वाव मिळाला आहे आणि त्याचं त्यांनी सोनं केलं आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर संदीप कुलकर्णी यांना पाहायला मिळालं. त्यांचा वावरही अत्यंत सहज आहे. एक हाडाचा शिक्षक असलेले देशपांडे सर त्यांनी खूपच ताकदीने उभे केले आहेत. सहजसुंदर आयुष्य बाजूला सारून, एका मोठय़ा शाळेतील नोकरी सोडून नाईट स्कूलमध्ये नोकरी पत्करणारे आणि त्या नाईट स्कूलचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी दिवसरात्र एक करणारे देशपांडे सर त्यांनी उत्तम साकारले आहेत. त्याचबरोबर चित्रपटातील विद्यार्थ्यांनीही कामं खूप चांगली केली आहेत.
ही झाली चित्रपटाची तगडी बाजू. आता चित्रपटाच्या लुळ्या बाजूचा विचार करायचा तर प्रामुख्याने ‘भरकटलेलं कथानक’ या गोष्टीवर भर द्यायला हवा. नाईट स्कूल असं नाव असलेला चित्रपट नाईट स्कूल आणि त्याची प्रगती या भोवती फिरणं अपेक्षित होतं. पण काही काळाने हा चित्रपट देशपांडे सर आणि त्या शाळेतील गरीब पण अत्यंत हुशार विद्यार्थी कृष्णा (साईगणेश रांजणकर) यांच्या नात्याभोवती फिरतो. मध्येच कृष्णाला झालेला रक्ताचा कर्करोग, पेपरफुटी प्रकरण, रात्रशाळेच्या मुख्याध्यापकाला (अशोक महाजन) वस्तीतल्या भाईने काळं फासण्याची घटना, यांची सुसंगती लागत नाही. चित्रपटात काही त्रुटीही राहिल्या आहेत.
रात्रशाळेच्या मुलांचा संघ कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचतो. पण त्यांचा कर्णधार येऊ शकत नाही. इतर वेळी मुलांची आस्थेने चौकशी करणारे, त्यांच्या अनुपस्थितीबाबत खोलात जाऊन शोध घेणारे देशपांडे सर कर्णधाराला, तू अंतिम सामन्याला का आला नाहीस, हा साधा प्रश्नही विचारत नाहीत. तसंच, पेपरफुटी प्रकरणात रात्रशाळेतील मुलांचा सहभाग, अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली आहे, हे प्रेक्षकांना स्पष्ट होण्याआधीच देशपांडे सर आणि फडतरे अण्णा त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन धडकतात. या गोष्टींचा विचार केला, तर काही उत्तम प्रसंग दिग्दर्शित करणाऱ्या मानसिंग पवार यांना डुलकी लागली होती का, असा विचार आल्याशिवाय राहत नाही. या काही कच्च्या दुव्यांचा विचार करूनही हा चित्रपट एकदा पाहावा असा झाला आहे.
वनमाळी फिल्म्स बॅनर प्रस्तुत
नाईट स्कूल
निर्माता – नीतीन मावाणी
दिग्दर्शक – मानसिंग पवार
छायालेखक- प्रकाश शिंदे
संकलन – परेश मांजरेकर
कलावंत – संदीप कुलकर्णी, प्रसाद पंडित, श्रीकांत यादव, अन्वेय केंद्रे, दीपा चाफेकर, राजू गोविलकर, शिवराज वाळवेकर, आशित आंबेकर व रात्र शाळेतील ४० विद्यार्थी.

Story img Loader