छावणीतील ख्रिश्चन वसाहतीमध्ये चार पिढय़ांपासून राहत असलेल्या ख्रिश्चन नागरिकांना छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिगेडियर सुरेंद्र पावामणी यांनी अतिक्रमणाची नोटीस बजावली. मात्र, या कारवाईतून आपणास वाचवावे, अशी विनंती या नागरिकांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना निवेदन देऊन केली आहे.
संत फिलिप चर्च, क्राइस्ट चर्च प्रायमरी, क्राइस्ट चर्च हायस्कूल, मुलींचे वसतिगृह असलेल्या छावणीतील ख्रिश्चन वसाहतीत गेल्या चार पिढय़ांपासून हे नागरिक राहत आहेत. नाशिक डायोसेशन कौन्सिल पीटीआरडी २ या संस्थेच्या ताब्यातील ११ एकर ३ गुंठे जागेत १८७५पासून ही वसाहत आहे. छावणी परिषदेंतर्गत हा परिसर येतो. नव्याने सुरू होणाऱ्या अतिक्रमण मोहिमेत ख्रिस्तनगरवासीयांना खोटय़ा नोटिसा बजावण्यात आल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे. दुष्काळाची भयावह स्थिती असताना मोलमजुरी करणारे ख्रिस्ती बांधव अतिक्रमणामध्ये पाडापाडी झाल्यास रस्त्यावर येतील. ब्रिगेडियरसमोर आत्मदहनाशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ही वेळ येऊ नये म्हणून या कारवाईतून वाचविण्याची विनंती निवेदनात केली आहे. शिवसेना शहरउपप्रमुख किशोर कच्छवाह यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनावर जे. एस. श्रीसुंदर, एस. के. श्रीसुंदर, सविता आव्हाड, सागर फोशे, जोसेफ पाटोळे, महेंद्र साळवे, सुरेश काकडे, दीपक पाठक, सीमा वडागळे आदींच्या सह्य़ा आहेत.

Story img Loader