नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात नाताळला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली असून, यानिमित्त पुढील सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणचे चर्च आकर्षक रोषणाई आणि येशू ख्रिस्त जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी सजले आहेत. यानिमित्त बाजारात
ख्रिसमस ट्री अन् वेगवेगळ्या गिफ्टस्ची रेलचेल झाली आहे.
दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की, प्रत्येकाला नाताळ आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या ‘थर्टी फर्स्ट’चे वेध लागलेले असतात. नाताळनिमित्त नाशिकरोड व शरणपूर रोड भागातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांची चढाओढ सुरू झाली. नाताळच्या पाश्र्वभूमीवर सध्या शरणपूर रस्त्यावरील सेंट आंद्रिया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलीक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील सेंट अ‍ॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रिक चर्च आदी ठिकाणी ख्रिस्त जन्माचे आकर्षक देखावे साकारण्यात आले. बहुतेक चर्च नेत्रदीपक रोषणाईने झगमगले आहेत. ख्रिसमस ट्री, रंगबेरंगी चमकणाऱ्या पताकांमुळे रोषणाईत वेगळेच रंग भरले गेले. ठिकठिकाणच्या चर्चेमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. रात्री ख्रिस्तजन्माचा सोहळा झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता बहुतेक ठिकाणी महाभक्ती अर्थात सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. आनंद मेळा, विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, चर्चच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घरातही देखावे साकारताना कुटुंबीयांनी अधिकाधिक कल्पकता आणण्याचा प्रयत्न केला. नाताळनिमित्त सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सण केवळ ख्रिश्चनधर्मीय नव्हे, तर सर्व घटक मोठय़ा उत्साहाने तो साजरा करत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नाताळनिमित्त ५० ते तीन हजार रुपयांपर्यंत ख्रिसमस ट्री, २० ते एक हजार रुपयांपर्यंतच्या किमतीच्या बेल्स, ट्री सजावट साहित्य, म्युझिकल लाइटिंग, पुतळा आदी वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिक शहरातील बडय़ा व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सांताक्लॉजला आणण्याचा मार्ग स्वीकारला. एकूणच नाताळामुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण वेगळ्याच उत्साहाने भारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा