मराठवाडय़ातल्या या दुष्काळाने सर्वसामान्य माणूस हादरून गेला. पुस्तके वाचणाऱ्या आणि त्यांच्याशी मैत्री असणाऱ्यांच्या मनात मात्र एक नाव सतत रुंजी घालत होते, ते म्हणजे भास्कर चंदनशिव. १९७० च्या दशकातील ग्रामीण जीवन रेखाटणारा हा लेखक दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर चर्चेत आहे.
सर्वसामान्य माणसाची संवेदना हेच चंदनशिव यांच्या लिखाणाचे ऊर्जाकेंद्र. वास्तवाच्या तळाशी लेखक म्हणून जोडले जाणारे प्रमुख नाव म्हणजे चंदनशिव. त्यांनी केवळ ग्रामीण जीवनाचे चित्रण केले नाही, तर ग्रामीण जीवनातील दु:खाचे मूळ कोठे आहे, याचा कलात्मकरीतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. यंदा ओढावलेला दुष्काळ आणि मराठवाडय़ातील ग्रामीण भागात खदखदणारी वेदना चंदनशिव यांच्या साहित्यात पावलोपावली निदर्शनास येते.
१९७० च्या दशकात मराठी साहित्यात प्रामुख्याने बदल सुरू झाले. त्यात दलित साहित्याची चळवळ अधिक प्रभावी होती. त्यामुळे त्याचे परिणामही एकूण साहित्यविश्वात स्पष्टपणे दिसू लागले. या परिणामांचाच सर्वसामान्य स्तरातील अनेकांवर प्रभाव पडला. त्यातूनच आदिवासी, स्त्रीवादी ग्रामीण साहित्याचा उदय मराठीमध्ये झाला. याच दशकात हा धागा पुढे घेऊन जाणाऱ्यांमध्ये प्रा. भास्कर चंदनशिव या मराठीतील महत्त्वाच्या कथाकाराचा उल्लेख केल्याखेरीज ग्रामीण साहित्याचा परीघ पूर्ण होत नाही.
निजाम राजवटीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हासेगांव या खेडय़ात ग्रामीण साहित्याला नवे आयाम देणाऱ्या चंदनशिव यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई आणि औरंगाबाद असा प्रवास त्यांनी केला. ऐन विशीत असताना भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडय़ाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला. १९६२ ते ७२ या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी काम केले. त्यातूनच पुढे निर्माण झालेल्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडय़ात घट्ट रुतलेले आहे. अशा कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाचा तळ ढवळून काढणारी कथा अभावानेच पहायला मिळते. त्यात चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारूळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहाने शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.
केवळ कथासंग्रहाच्या माध्यमातूनच नव्हे, तर ‘रानसई’सारख्या ललित संग्रहातून, ‘भूमी आणि भूमिका’ या वैचारिक संग्रहातूनदेखील ग्रामीण साहित्याचा संशोधनाच्या पातळीवर त्यांनी अभ्यास केला. स्वातंत्र्योत्तर ग्रामजीवनाच्या बदलत्या वास्तवांचा आणि समस्यांचा शोध त्यांच्या साहित्यातून घेण्यात आला आहे. निजामकालीन ग्रामसंस्कृती आणि त्यानंतर महाराष्ट्रात सहभागी झालेला हा भूभाग एकत्रितपणे चंदनशिव यांनी साहित्याच्या पटलावर मांडला. त्यांनी संपादित केलेल्या शेतकऱ्याचा आसूड, ग्रामीण आत्मकथन, ज्योती म्हणे अखंड काव्यरचना या साहित्यकृतीवरून देखील त्याचा प्रत्यय येतो.
अनेक पुरस्कार आणि साहित्य संमेलनात मानाचे स्थान असणाऱ्या भास्कर चंदनशिव दुष्काळाच्या निमित्ताने नव्याने चर्चेत आहे. २८ वे मराठवाडा साहित्य संमेलन आणि कळंब येथे झालेल्या ३० व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. समकालिन वास्तवांचा आणि वास्तवातील समस्यांचा शोध घेण्याबरोबरच चंदनशिव यांनी मानवाच्या जैविक गरजांचादेखील वेध घेतला आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठातून ग्रामजीवनाचा थोर बखरकार असलेल्या भास्कर चंदनशिव यांच्या साहित्याचा अभ्यास केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा