मुस्लीम कुटुंबात जन्म. कीर्तनकलेला समर्पित जीवन. कीर्तनाबरोबरच वारीनृत्य, सातपरात, घागरनृत्य, घागरनिरंजनी नृत्य, घागरसमयी नृत्य, जोगवा, भारुड अशा अस्सल लोककलांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आयुष्यभर प्रामाणिकपणाने जोपासलेला छंद व प्रयत्न.. ग्रामीण भागात धर्म-जातीचा मोठा पगडा असताना रियाजोद्दीन शेख हा रामभक्त कसा झाला, किंबहुना पाहणाऱ्यांचे श्वास रोखणारे सातपरात, सनई नृत्य कोठून शिकला, हे प्रश्न आपसूक पडतात. पण राजूबाबा शेख यांचे जीवन जवळून पाहणाऱ्यांना व अनुभवणाऱ्यांना याची सुसंगत-स्वाभाविक उत्तरे सहज मिळतात. नवी दिल्लीच्या संगीत व नाटक अकादमीचा लोकरंगभूमी पुरस्कार शेख यांना अलीकडेच जाहीर झाला. या पुरस्काराने शेख यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
केज येथील शेख रियाजोद्दीन ऊर्फ राजूबाबा (वय ७२) यांचा आजवरचा जीवनप्रवास एक स्वतंत्र अध्याय व्हावा. मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या राजूबाबांची कीर्तनकलेशी नाळ कायमची जुळलेली, इतपत त्यांनी या विश्वात स्वत:ला झोकून देत काम केले. एखादी घटना माणसाच्या आयुष्यालाच कलाटणी देते. असेच काहीसे रियाजोद्दीनचे झाले. मूळ वडवणी येथील अब्दुल गणी व महेताबी या मुस्लीम दाम्पत्याला पाच मुले. मोलमजुरी करून सर्वसाधारण जीवन जगणारे. याच काळात १९४८ ला निजामाचे राज्य खालसा करताना अब्दुल गणी मारले गेले. महेताबीन या चार मुले व एका मुलीला घेऊन केजला स्थलांतरित झाल्या. याच कुटुंबातील सात वर्षांचा रियाजोद्दीन हा किसनराव ससाणे या शेतकऱ्याकडे गुराखी म्हणून काम करू लागला. गुरे राखत असताना श्रावणात गावातील लोक बेलाची पाने घेऊन महादेवाची पूजा करीत. रियाजोद्दीननेही पूजा सुरू केली. शेतमालकाच्या मुलाने रामकथा वाचून दाखवली, त्यावेळी रामाच्या वनवासाची कहाणी ऐकून रियाजोद्दीनच्या बालमनावर चांगलाच परिणाम झाला आणि तो रामभक्त झाला तो कायमचाच.
गावातील राममंदिरात भजनाचा कार्यक्रम ऐकून तो पाठ करायचा, त्याची जिद्द पाहून छोटय़ाशा रियाजोद्दीनला आपल्यात सामावून घेतले आणि हा रियाज अष्टगंध, बुक्का, गळय़ात तुळशीची माळ घालून वारकरी झाला. शाळेचे तोंडही न पाहिलेला रियाज स्वतच अ, ब, क शिकून रामायण आणि पोथी वाचण्यात पारंगत झाला. भजनात तो इतका तल्लीन झाला की, पाणी भरत असताना चुंबळीशिवाय डोक्यावर घागर घेऊन रस्त्यानेच गात असे. वयाच्या पंधराव्या वर्षी रियाजला गावकऱ्यांनी डोक्यावर घागर ठेवून कार्यक्रम करायला सांगितले आणि पहिल्याच कार्यक्रमात लोकांची मने जिंकली. या वेळी रियाजला ८० रुपये मिळाले. यातून पंढरपूरहून घागर, निरंजन, सनई अशा वस्तू आणून गवळण व भारुडावर कार्यक्रम सादर करीत तो लोकांना मंत्रमुग्ध करू लागला. याची चर्चा गावोगावी पोहोचल्याने लोक कार्यक्रमास बोलावू लागले. राम, विठ्ठल भक्त झालेला हा रियाजोद्दीन अब्दुल गणी ‘राजूबाबा’ नावाने ओळखला जाऊ लागला.
जन्माने मुस्लीम असताना भजन आणि कीर्तन करीत असल्याने व्हायचा तो त्रास स्वकियांकडून सुरू झाला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मोठय़ा भावाने जमातीमध्ये पाठवले, हीही ईश्वरभक्ती आहे म्हणून राजूबाबाने स्वीकारले. सांगलीत एकदा मंदिरातून मौलवींनी ओढत आणले. त्यामुळे मशिदीतच मोठय़ाने भजन सुरू केल्यानंतर मारही खावा लागला. इतकेच नव्हे तर लग्न ठरल्यावर सासऱ्यानेही धमक्या दिल्या. मात्र, विठ्ठलभक्तीत रमलेला राजूबाबा डगमगला नाही. काही काळानंतर मुस्लीम समाजाच्या लोकांनीही राजूबाबाच्या भक्तीला स्वीकारले.
विठ्ठलभक्त राजूबाबाचे भगवान श्रीकृष्ण हे आराध्यदैवत. भक्ती आणि नृत्य यांचा अद्भूत चमत्काराचा आविष्कार राजूबाबाच्या अंगी विकसित झाला. धोतर, बाराबंदी पगडी, कपाळाला बुक्का लावलेला रियाज विनाचिपळ्या वाजवत देहभान विसरून भजन, गवळणी नाचतो, तेव्हा पाहणारे चकित होतात. स्वतभोवती गिरक्या घेत डोक्यावरची पगडी काढून पाण्याने भरलेली पितळी घागर डोक्यावर ठेवून दोन्ही हात मोकळे ठेवून नाचू लागतो, तेव्हाचे दृश्य थक्क करणारे असते. नाचत-नाचत डोक्यावर निरंजनी ठेवतो, याच निरंजनीवर पुन्हा भरलेली घागर ठेवतो आणि दोन्ही हात सोडून भजन गाऊ लागतो, तेव्हा पाहणाऱ्यांचे श्वास रोखले जातात. इतक्यावरच हा थांबत नाही तर एक फूट उंच पेटलेली समई, समईवर निरंजनी आणि निरंजनीवर भरलेली घागर डोक्यावर ठेवून दोन्ही हात मोकळे ठेवून नाचू लागतो, तेव्हा पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. एकात एक सात पराती समोर आणून ठेवल्या जातात. या पराती डोक्यावरचा डोलारा सांभाळत एकेक करीत वेगळया करून परातीच्या काठावर उभे राहून नाचू लागतो. काही क्षणात वेगळ्या पराती एकत्र करतो आणि पाहणारे थक्क होऊन जातात.
असा हा अस्सल ग्रामीण लोककलांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा राजूबाबा मागील ४० वर्षांत सर्वदूर पोहोचला. पण आजही राम आणि विठ्ठलभक्ती तितकीच तल्लीन होऊन सुरू आहे. पत्नी व दोन मुले हे राजूबाबाचे कुटुंब शहरात सामान्याप्रमाणे जीवन जगत आहे. राजूबाबाला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले. यात राज्य सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, शास्त्रीय नाटय़ परिषद (नवी दिल्ली), पद्मश्री विखे कला परिषद (प्रवरानगर) या मानाच्या पुरस्कारांचा यात समावेश आहे. नवी दिल्ली येथील संगीत नाटय़ अकादमीचा लोकरंगभूमी पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात रोवला गेला आहे.
हरिभक्तपरायण ‘राजूबाबा’!
केज येथील शेख रियाजोद्दीन ऊर्फ राजूबाबा (वय ७२) यांचा आजवरचा जीवनप्रवास एक स्वतंत्र अध्याय व्हावा. मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या राजूबाबांची कीर्तनकलेशी नाळ कायमची जुळलेली, इतपत त्यांनी या विश्वात स्वत:ला झोकून देत काम केले.
First published on: 07-12-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Churchetala chehara rajubaba