सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी ललित ऊर्फ लल्ल्या गजभिये याच्या सर्व कारनाम्याची चौकशी आवश्यकता भासल्यास सीआयडीमार्फत केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी येथे वार्ताहरांना एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
लल्ल्या गजभिये याला तरुणींना आपल्या मोहजाळ्यात अडकवून त्यांच्या अश्लील चित्रफिती काढून लाखो रुपयांची खंडणी मागणे आणि ब्लॅकमेल करणे इत्यादी आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी दुर्गा वाहिनी युवती संघटनेने आणि भाजपच्या महिला आघाडीने केली आहे. लल्ल्या गजभियेच्या घरी छापा टाकून पोलिसांनी छुपे कॅमेरे, बऱ्याच अश्लील सीडी व एक नवी कार जप्त केली आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील हे माहूर येथे रेणुका देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी यवतमाळात थांबले होते. त्यांचा हा दौरा खाजगी असल्याने पोलिसांशिवाय कुणालाच माहीत नव्हती. मात्र, गृहमंत्री यवतमाळात आल्याची बातमी पसरली तेव्हा शासकीय विश्राम भवनावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. विविध संघटनांनी लल्ल्याच्या सेक्स स्कँडलची माहिती आर.आर. पाटील यांना दिली तेव्हा आवश्यकता भासल्यास या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या सेक्स स्कँडलची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. आरोपी लल्ल्या गजभियेने एक फ्लॅट भाडय़ाने घेऊन त्या ठिकाणी सर्वत्र छुपे कॅमेरे बसवले होते. तेथे तो जाळ्यात अडकवलेल्या तरुणींच्या अश्लील चित्रफिती काढून त्यांना ब्लॅकमेल करून लाखोची खंडणी वसूल करत असे, असा त्याच्यावर आरोप आहे. ठाणेदार विपीन हसबनिस यांनी लल्ल्याची शहरातून धिंड देखील काढली होती. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cid investigation of sex scandal accused rr patil