बारडगाव दगडीचा चाराघोटाळा
कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील चारा घोटाळ्याची आजपासून सीआयडी चौकशी सुरू झाली आहे. सीआयडीचे महासंचालक प्रकाश मुत्याल यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे पोलीस निरीक्षक कदम, अखाडे यांच्यासह १५ जणांचे पथक ही चौकशी करीत आहे.
येथील एकनाथ पाटील सेवाभावी संस्थेने चाराडेपोत गैरव्यवहार केल्याची तक्रार भाजपचे व्यापारी सेलचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी प्रथम केली व नंतर माहितीच्या अधिकारात त्यांनी हा घोटाळा समोर आणला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी काल नागपूर अधिवेशनात या प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानंतर अवघ्या काही तासांत म्हणजे बुधवारी रात्री साडेआठ वाजताच सीआयडीचे पथक कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाले. या संदर्भात पथकाने तत्कालीन तहसीलदार सुरेश थोरात, मंडलाधिकारी रासकर, कामगार तलाठी पठाण, महसूलचे लिपीक हुंदाडे व साळुंखे, एकनाथ पाटील संस्थेचे चालक चमस थोरात यांच्यासह बारडगावच्या काही शेतकऱ्यांकडे चौकशी केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी पथकाकडे चाराडेपोविषयी अनेक तक्रारी केल्या.
या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना श्रीकांत मुत्याल म्हणाले की, यासंदर्भात सखोल चौकशी होणार असून संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला कधीही चौकशीसाठी बोलावले जाईल. यात संबंधित दफ्तरही जप्त केले जाईल. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या घटनेची सीआयडी चौकशी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. या चौकशीमुळे महसूल विभाग व चारा डेपोचालकांत मोठी खळबळ उडाली आहे.
एकनाथ पाटील या संस्थेने चारा आणण्यासाठी जे वाहनाचे क्रमांक दिले आहेत, त्यातील वाहने ठाणे, कल्याण, पेण, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नगर, जालना, बीड, धुळे, मालेगाव, नाशिक अशा विविध शहरांमधील आहेत. गमतीचा भाग म्हणजे लुना, एमएटी, जेसीपी, मोटारसायकल, स्कूटर, मिनीडोअर, मारूतीकार अशी ही वाहने आहेत. यातील १९८९ सालच्या लुना गाडीवरून (एच १६-१६९०) एकावेळी तब्बल २३ टन ५४० किलो चारा आणल्याचे दाखवले आहे. तसेच एमएटी या मोपेडवर १५ टन २४५ किलो, मारूती कारमध्ये सुमारे १८ टन, तर जेसीबीमधून एका वेळी २० टन चारा वाहून आणल्याचे दाखवले आहे. अशा प्रकारे अनेक बोगस क्रमांकाची वाहने दाखवलेली आहेत. लुनाने तब्बल १५ खेपांत १२८ टन, एमएटीने ४ खेपांत ४२ टन, मोटारसायकलने ७४ खेपांत ७०९ टन अशा पध्दतीने ही वाहतूक केल्याचे दाखवण्यात आले आहे. क्रमांकानिशी नोंदवलेली काही वाहने तर अस्तित्वात नसल्याचे संबंधित आरटीओंनी कळवले आहे. त्याही पुढे जाऊन या वाहनांवर गावचे सरपंच नितीन पिसे यांनाच या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून दाखवले आहे. तसेच एका चालकाने एकाच दिवशी एकाच वेळी तीन वाहने चालवल्याचेही या नोंदीवरून दिसते.     

Story img Loader