औरंगाबाद शहराभोवतालच्या २८ गावांतील १५ हजार १८४ हेक्टर जमिनीचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोकडे सोपविण्यात आली आहे. या अनुषंगाने झालर क्षेत्रासंबंधात नगररचना विभागाने तयार केलेला मसुदा सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून हा आराखडा मंजूर होत नसल्याने विकासकांमध्ये कमालीची नाराजी होती. स्वत: सिडकोही विकास करीत नाही आणि खासगी व्यावसायिकांनाही विकास करू दिला जात नाही, असे मत मांडले जात होते. विशेषत: बांधकाम व्यावसायिकांनी या अनुषंगाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. झालर क्षेत्रासंबंधातील २८ गावांच्या नियोजनाची जबाबदारी आता सिडकोकडे सोपविण्यात आली. हा मसुदा नगररचना विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता. त्यास मंजुरी देण्यात आली.
वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आवश्यकतेप्रमाणे किती पदे भरावीत व ती कोणत्या स्तरावरची असावी, या विषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.