जेएनपीटी बंदरामुळे सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरात दररोज आठ ते दहा हजार वाहने ये-जा करीत असून अनेकदा ही वाहने वाहनतळ नसल्याने तासन्तास रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. वाहतूक कोंडीविरोधात २०१२ साली झालेल्या आंदोलनानंतर सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील तीन ठिकाणी प्रासंगिक वाहनतळांसाठी जागेचे आरक्षण केलेले होते. तसे फलकही लावण्यात आले होते. असे असले तरी तीन वर्षांनंतरही सिडकोचे हे वाहनतळ सुरू झालेले नाहीत. हे वाहनतळ सिडकोच्या तारेच्या कुंपणात अडकून पडले असल्याने सिडकोने जाहीर केलेल्या वाहनतळांना मुहूर्त कधी सापडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी जेएनपीटीमधील जड वाहनचालकांनी वाहनतळाची तसेच इतर गैरसोयीमुळे त्रस्त होऊन जेएनपीटी परिसरात जाळपोळ करून उद्रेक केल्याची घटना ताजी असतानाही जेएनपीटी तसेच सिडको आणि जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत जेएनपीटी तसेच द्रोणागिरी परिसरात अधिकृत वाहनतळे उभारण्याचे मान्य केले होते. त्यामुळे सिडकोने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर-१२ तसेच पागोटे व न्यू मर्क्‍स अशा तीन ठिकाणच्या जागा प्रासंगिक वाहनतळांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. त्यामुळे द्रोणागिरी नोडमधील जड वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. याचा फटका मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. दुसरीकडे द्रोणागिरी नोडमधील सेक्टर-५ मध्ये सिडकोने पार्किंग झोन विकसित केला आहे. मात्र या सिडकोच्या अधिकृत पार्किंगमध्ये वाहने उभी केली जात नसल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. त्यामुळे सिडकोने जाहीर केलेल्या प्रासंगिक वाहनतळांच्या सपाटीकरणाचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रासंगिक वाहनतळ सुरू करायचे की नाहीत याचा निर्णय सिडको वरिष्ठ पातळीवर घेईल, असे मत सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे अधीक्षक अभियंता आर. एस. नायक यांनी व्यक्त केले आहे. तसेच या जागा सिडकोने इतर कामांसाठी ठेवल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सिडकोने आरक्षित केलेले प्रासंगिक वाहनतळ सुरू होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
जगदीश तांडेल, उरण

Story img Loader