सिडको अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल अग्निशमन दलांतील समस्यांना ‘लोकसत्ता’च्या ‘ठाणे वृत्तान्त’मधून वाचा फोडल्यानंतर गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या दलांसाठी अतिरिक्त २५२ जवानांच्या नोकरभरतीला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर या दलामध्ये असलेल्या केवळ २४ जवानांना कामाचा जादा मोबदला दिला जाणार असून त्यांच्या कामाचे आठ तास करण्यात आले आहेत. संपूर्ण नोकरभरती होत नाही तोपर्यंत या जवानांना तीस दिवसांची भरपगारी रजा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जादा नोकरभरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
सिडकोच्या तीन अग्निशमन दलांतील जवानांची अत्यंत वाईट स्थिती असून त्यांना २४ तास कामावर हजर राहावे लागत असल्याची बातमी ‘ठाणे वृत्तान्त’ने प्रसिद्ध केली होती. या अधिक कामामुळे या जवानांच्या शारीरिक, मानसिक क्षमतेवर परिणाम होत असल्याची बाब मांडण्यात आली होती. या समस्येबरोबरच इतर समस्या या बातमीत नमूद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सिडकोने गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय तातडीने घेतला. त्यात या जवानांच्या कामाचे आठ तास करण्याचा प्रस्ताव होता. तो मंजूर करण्यात आला. अतिरिक्त काम करणाऱ्या जवानांना अधिक मोबदला दिला जाणार असून तीस दिवसांची भरपगारी रजादेखील दिली जाणार आहे. ही रजा त्या जवानाने न घेतल्यास त्याची रोख रक्कम दिली जाणार आहे. आग विझविण्यास जाणाऱ्या जवानांना रिस्क भत्ता दिला जातो, मात्र या दलात तो दिलाच जात नव्हता. त्यामुळे सिडको कामगार संघटनेच्या मागणीनुसार तो बेसिक पगाराच्या दहा टक्के देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रेड पी सेवेसाठीही वीस टक्के भत्ता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आग विझविण्यास जाताना बंद पडणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून सात वाहने तातडीने घेण्यात आली आहेत. ही वाहने २० वर्षे जुनी होती. या निर्णयामुळे या दलातील जवानांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून रोजंदारीवर काम करणाऱ्या जवानांच्या बाबतीतही पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल यांनी सांगितले.

Story img Loader