नवी मुंबईत सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बेलापूर- तळोजा-खांदेश्वर -प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ या पहिल्या व त्यानंतरच्या चार मेट्रो मार्गालगत येणाऱ्या १०० हेक्टर जमिनीचा वाणिज्यिक विकास करणार असून त्यासाठी सल्लागार कपंनी नेमणार आहे. मेट्रो रेल्वे मार्गालगत मॉल, रेस्टॉरन्ट, मनोरंजन केंद्र यांची आखणी कशा प्रकारे करायची आणि हे भूखंड कधी विकायचे, हे ही सल्लागार कंपनी सिडकोला एका सर्वेक्षणानंतर सागणार आहे. हाँगकाँगमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता.
मास रॅपिड ट्रान्सपोर्टेशनच्या मास्टर प्लॅनअंतर्गत नवी मुंबईत रेल्वेचे सहा मार्ग सुचविण्यात आले आहेत. त्यातील दोन पूर्ण झाले असून एक उभारण्याचे काम सुरू आहे, तर दोन प्रस्तावित असून एकाला मेट्रो रेल्वेचा पर्याय देण्यात आला आहे. या सर्व मार्गाना जोडणारी मेट्रो रेल्वे आवश्यक असल्याचे मत दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपरेरेशनने मांडले होते. त्यानुसार सिडकोने सीबीडी बेलापूर- तळोजा- खांदेश्वर- नवी मुंबई विमानतळ या मार्गाची मुहूर्तमेढ रोवली असून कामास सुरुवातदेखील केली आहे. यातील ६० टक्के काम पूर्णही झाले आहे. जमीन संपादनाची कटकट नसल्याने या कामाने वेग घेतलेला आहे. बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या २३ किलोमीटरच्या पाहिल्या मार्गाबरोबरच सिडको मानखुर्द-पनवेल (३२ कि.मी.), शिवडी- नवी मुंबई विमानतळ (२२ कि.मी.), दिघा- बेलापूर (२० कि. मी.) आणि वाशी-महापे (९ कि.मी.) हे मार्ग तयार करणार आहेत. या मार्गात ३९ रेल्वे स्थानके बांधली जाणार आहेत. त्यामुळे या भागाचा मोठय़ा प्रमाणात विकास होणार आहे. या मार्गाच्या दुतर्फा सिडकोच्या मालकीची १०० हेक्टर जमीन आहे. त्या जमिनीचा विकास कशा प्रकारे करावा याचा विचार आतापासून सुरू झाला असून, यात या जमिनीत कोणत्या व्यवसायांना प्राधान्य द्यावे याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. या भूखंडाची विक्रीही या कंपनीच्या वतीने निश्चित केली जाणार आहे. जगातील सिंगापूर, हाँगकाँगमध्ये असणाऱ्या मेट्रो स्थानकाजवळ अशा प्रकारे व्यापारी संकुले विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानकावर उतरल्यानंतर प्रवासी घरात लागणारे सर्व सामान घेऊनच घरी जाऊ शकतो, अशी त्यामागची संकल्पना आहे. सिडकोने हा प्रयोग यापूर्वी रेल्वे संकुलात करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. मागील आर्थिक मंदीच्या काळात करण्यात आलेल्या या प्रयोगातील अनेक संकुले सध्या वापरात नाहीत. मात्र आता काळ बदलला असून भारतीय रहिवाशांची खरेदी क्षमता मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते. त्यामुळे सिडको या ठिकाणी केवळ वाण्यांची दुकानेच उघडणार नसून या घरगुती वस्तूंबरोबरच मनोरंजनाची सर्व साधने या मार्गाच्या जवळपास उपलब्ध करून देण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यासाठी लवकरच स्वारस्य रस निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी दिली. 

Story img Loader