नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने २६ कलमी कार्यक्रम आखला असून त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडको, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. जुन्या गावांचा येत्या पाच महिन्यांत सिटी सव्‍‌र्हे पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. समितीच्या वतीने गुरुवारी सिडको व एमआयडीसी प्रशासनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी महापे येथे काही काळ ठाणे बेलापूर रस्ता रोको केला.
एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना पिंपरी चिंचवड एमआयडीसीच्या धर्तीवर पंधरा टक्के विकसित भूखंड देण्यात यावेत, अविकसित भूखंड शेतकऱ्यांना परत करण्यात यावेत यासारख्या २८ मागण्या घेऊन कृती समितीने महापे येथील एमआयडीसी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र एमआयडीसीचा गुरुवारी वर्धापनदिन असल्याने कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे समिती वर्धापनदिनी मोर्चाचे आयोजन का करते, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. महापे येथे समितीचे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर त्यांचा मोर्चा सिडकोच्या बेलापूर येथील कार्यालयावर धडकला. सिडकोचे एमडी भाटिया यांनी दीड तास समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांना तक्रार करण्याची यानंतर संधी मिळणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्यासाठी २६ कलमी कार्यक्रम आखण्यात आला असून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची तयारी भाटिया यांनी दाखविली. या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते श्याम म्हात्रे, समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील,कार्याध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांनी केले.

Story img Loader