विमानतळ किंवा न्हावा- शिवडी मार्ग प्रकल्पामधील बाधितांना भूसंपादनावेळी सिडकोच्या नोकरभरतीत समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्याचा रेटा लावायचा, मात्र प्रत्यक्षात नोकरभरतीवेळी धोरणात्मक निर्णयाचा आधार घेऊन भरतीमध्ये डावलायचे हा सिडकोचा दुटप्पीपणा आता समोर आला आहे. सिडकोने नुकत्याच १८४ पदांच्या नोकरभरतीसाठी काढलेल्या जाहिरातीमध्ये विविध जातीनिहाय आरक्षण ठेवले आहे. मात्र ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प वसवायचे आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना या नोकरभरतीमध्ये कोठेही जागा ठेवलेली नाही. सिडकोच्या या धोरणाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला आहे. यासाठी दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी सिडकोसोबत दोन हात करण्याचा निर्धार केला आहे.
सिडकोने नुकतीच नोकरभरतीविषयी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १९ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत मागविण्यात आलेल्या १८४ पदांसाठी प्रकल्पग्रस्तांना कोठेही स्थान नसल्याने सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने गेली कोठे, असा प्रश्न पनवेल आणि उरणचे ग्रामस्थ विचारत आहेत. या नोकरभरतीमध्ये विकास अधिकारी, साहाय्यक विकास अधिकारी, लेखाधिकारी, साहाय्यक लेखाधिकारी, साहाय्यक अभियंता (सिव्हील), साहाय्यक विधितज्ज्ञ, कनिष्ठ नियोजनकार, साहाय्यक सर्वेक्षक, साहाय्यक अभियंता (वीज), साहाय्यक अभियंता (टेलीकॉम), क्षेत्रअधिकारी, उच्चश्रेणी स्टेनो, लेखापाल, मुख्य अभियंता, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, अतिरिक्त मुख्य नियोजनकार, अधीक्षक अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, वरिष्ठ विकास अधिकारी, परिवहन अधिकारी, विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, उपनियोजनकार अशा पदांसाठी अर्ज मागविले आहेत.
नोकरभरतीच्या प्रक्रियेत उत्तीर्ण उमेदवारांना नऊ हजार ते ७० हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये अनेक तरुण सुशिक्षित आहेत. त्यामुळे या नोकरभरतीमध्ये आपल्याला संधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र सिडकोने प्रकल्पग्रस्तांना बाजूला सारून या नोकरभरतीची जाहिरात काढल्याने प्रकल्पग्रस्त तरुण संतापले आहेत.
दिबांच्या मृत्यूनंतर आता शेतकऱ्यांचा लढा संपला, अशी भावना रायगडात विशेषत: पनवेलमध्ये येणाऱ्या नवनवीन प्रकल्प व्यवस्थापनाची झाली आहे. मात्र तरुण शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा आपली वज्रमूठ आवळली आहे. दिबांचे पुत्र अतुल पाटील हे या तरुण प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करीत आहेत. या नोकरभरतीविषयी प्रकल्पग्रस्त तरुणांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये जागरूकता आणली.
त्यानंतर आमदार विवेक पाटील यांनी हा प्रश्न सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्याकडे मांडला. परंतु भाटीया यांच्याकडून त्याविषयी आमदार पाटील यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर अतुल पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. आमदार ठाकूर यांनी भाटीया यांच्याशी संपर्क साधला असून लवकरच तेही भाटीया यांची भेट घेणार असल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले.
सिडकोचा नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना ठेंगा
विमानतळ किंवा न्हावा- शिवडी मार्ग प्रकल्पामधील बाधितांना भूसंपादनावेळी सिडकोच्या नोकरभरतीत समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्याचा रेटा लावायचा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2014 at 04:15 IST
TOPICSप्रकल्पग्रस्त
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco recruitment project victims