नवी मुंबईतील १६ रेल्वे स्थानकांची डागडुजी करायची कुणी यावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू असून सिडकोने आता या स्थानकांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांचे दायित्व सिडकोकडे असताना सिडको या स्थानकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी बेलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको आंदोलन केल्यानंतर सिडकोला आपल्या या मालमत्तेची डागडुजी करण्याची आठवण झाली आहे.
जून १९९३ रोजी नवी मुंबईतील पहिली रेल्वे सेवा मानखुर्द ते वाशी अशी सुरू झाली. ही सेवा सुरू करण्यात सिडकोचा सिंहाचा वाटा असून सिडकोने या प्रकल्पासाठी ६७ टक्के खर्च केला आहे. एखाद्या शासकीय महामंडळाने रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी इतका मोठा खर्च करण्याची देशातील ही पहिली घटना आहे. त्यानंतर सिडकोने दिलेल्या आर्थिक सहकार्यावर नवी मुंबईतील रेल्वे सेवेचे जाळे पूर्ण झाले आहे. नऊ वर्षांपूर्वी ठाणे-तुर्भे रेल्वे सेवा सुरू होऊन हा त्रिकोण पूर्ण झाला. रेल्वे स्थानकावरच व्यावसायिक संकुल उभारून सिडको या प्रकल्पावर झालेला खर्च काढण्याच्या तयारीत होती, मात्र ही योजना फोल ठरली. त्यामुळे ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर अशा व्यावसायिक संकुलांना फाटा देण्यात आला. नवी मुंबईतील रेल्वे सेवेत अध्र्यापेक्षा जास्त हिस्सा असताना सिडको प्रशासन मात्र रेल्वे स्थानकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकातील गैरसोयींची तक्रार सिडकोकडे नेल्यास तेथील अधिकारी रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवीत तर रेल्वेकडे हा पाढा वाचल्यास रेल्वे प्रशासन सिडकोकडे प्रवाशांना पाठवीत होते. त्यामुळे या स्थानकांतील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या होत्या. पावसाळ्यात तर स्थानकात पाण्याचा धबधबा तयार होत असल्याचे दृश्य ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे या स्थानकांत दिसून येत होते. जगातील अनेक रेल्वे स्थानकांचे संकल्पचित्र नजरेसमोर ठेवून कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या स्थानकातील लाद्या गायब होण्याच्या घटना घडत आहेत. येथील सुरक्षारक्षक नावाला असून त्यांची या रेल्वे स्थानकातील भुरटय़ा चोरांबरोबर युती असल्याचे चित्र आहे. अस्वच्छता तर या स्थानकांच्या पाचवीला पूजलेली असून २५ कामगारांऐवजी पाच कामगार कामाला लावून कंत्राटदार २० कामगारांचा मलिदा खात आहेत. जुईनगर रेल्वे स्थानकात तर दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला फिरत असल्याचे दृश्य आहे. इंडिकेटरांचा पत्ता नाही तर बसायचे बाक तुटले आहेत. फेरीवाल्यांनी सुरक्षारक्षकांना हाताशी धरून आपला धंदा जोरात सुरू केला आहे. तिकीट खिडक्यांच्या नावाने बोंबाबोंब आहे. अशा अनेक समस्यांचा पाढा खासदार संजीव नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या समोर सोमवारी वाचला. त्या वेळी आपल्याच मालमत्तेची कशी वाट लागत असल्याची जाणीव भाटिया यांना सर्वप्रथम झाली. या वेळी प्रवाशी महासंघाचे अध्यक्ष दिनेश पारेख, सिडकोचे सर्व अधिकारी उपस्थित होते. लवकरात लवकर ही डागडुजी हाती घेतली जाईल, असे आश्वासन भाटिया यांनी या वेळी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा