सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी जवळील रेल्वेस्थानकांमध्ये येण्यासाठी परिवहन सेवेची आवश्यकता आहे. विशेषत: नवीन पनवेल ते पनवेल रेल्वे स्थानक, खांदा कॉलनी ते खांदेश्वर रेल्वे स्थानक आणि कळंबोली (रोडपाली) ते मानसरोवर रेल्वे स्थानक या मार्गावर तातडीने बसफेऱ्या सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.
सिडको वसाहतीत बहुसंख्येने असणारा नोकरदारवर्ग रेल्वेने प्रवास करतो. नोकरीसाठी मुंबई गाठणारे हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांकडे धाव घेतात. या प्रवाशांना सध्या पायपीट अथवा तीन आसनी रिक्षांशिवाय पर्याय नाही. सरकारच्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचा प्रवासी वर्गाकडे कानाडोळा होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन पनवेल, खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वे स्थानकांमध्ये ही बससेवा सुरू होऊ शकली नाही. कामोठे आणि खांदेश्वर येथील स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांचा विरोध असल्यामुळे मानसरोवर आणि खांदेश्वर स्थानकांमध्ये बससेवा सुरू होऊ शकली नाही. मात्र नवीन पनवेल परिसरात ही बससेवा सुरू करण्यास कोणाचाही विरोध नव्हता. किमान नवीन पनवेल येथील सुकापूर, डी मार्ट येथील झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरीकरणाचा विचार करता येथे सिटीबस असणे गरजेचे आणि संबंधित प्रशासनाला नफ्याचे ठरणार आहे. जुन्या पनवेल शहरातील बावनबंगला येथील प्रवाशांना खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सध्या खांदा कॉलनी सिग्नलपर्यंत शेअर रिक्षा किंवा मिनीडोअर प्रवासासाठी ८ रुपये, त्यानंतर पुन्हा खांदेश्वर सिग्नलकडून खांदेश्वर रेल्वे स्थानक या अर्धा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी रिक्षाला आठ रुपये मोजावे लागतात. खांदेश्वर शहरातील सिग्नल बाजूकडून हा प्रवास प्रती आसन १० रुपये एवढा पडतो. चार पावलांसाठी दोन रुपये जादा का, असा प्रश्न रिक्षा चालकांना विचारण्यात अर्थ नसतो. कारण स्थानिक रिक्षाचालक खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकांच्या परिसरात इतरांना रिक्षा आणूच देत नाहीत.
इकडे आड तिकडे विहीर..
प्रादेशिक परिवहन विभागाचे नंदकिशोर नाईक म्हणाले की, शहरांचा विकास करणाऱ्या सिडको अथवा पालिका या प्राधिकरणांनी ही बससेवा सुरू करणे अपेक्षित आहे. पनवेल पालिकेला त्यासाठी सरकारी मंजुरी मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी एनएमएमटीची बस सेवा सुरू झाली होती. स्थानिकांच्या आंदोलनानंतर ती बंद झाली. रिक्षाचालकांनी शेअर भाडे किती आकारावे यासाठी रेल्वे स्थानकांसमोर फलक लावले आहेत. आम्ही रिक्षाचालकांवर कारवाईचे हत्यार उपसले की हे रिक्षाचालक संपावर जातात. पर्यायी दुसरी वाहतुकीची सोय नसल्याने प्रवाशांचे यात हाल होतात.
परिवहन सेवेच्या अभावामुळे सिडकोवासीयांचे हाल
सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी जवळील रेल्वेस्थानकांमध्ये येण्यासाठी परिवहन सेवेची आवश्यकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-02-2014 at 07:38 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco residents misery