नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा विशेषत: विमानतळ प्रकल्पातील तरुणांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने सिडकोने अनेक उपाययोजना सुरू केल्या असून कॉर्पोरेट जगतातील कंपन्यांत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना खारघर येथील प्रशिक्षण केंद्रात सिडको शिष्टाचार शिकविणार आहे. यात टायची गाठ कशी बांधावी इथपासून ते डायनिंग टेबलवर चाकू-सुऱ्यांचा वापर करून जेवावे कसेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिडकोने तीन हजार तरुणांचा बायोडाटा जमा करून ठेवला आहे. नवी मुंबई शहर प्रकल्प उभारताना सिडकोने प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याची एक भावना तयार झाली आहे. दिवंगत दि. बा. पाटीलसारख्या काही प्रकल्पग्रस्त नेत्यांनी साडेबारा टक्के योजना लागू करण्यास सरकारला भाग पाडले नसते तर प्रकल्पग्रस्तांची स्थिती ना घर का ना घाट का अशी झाली असती असे म्हटले जाते. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून दिला जाईल या शब्दाला सिडको पूर्णपणे जागली नाही. त्यामुळे सिडकोने यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचा गमवलेला विश्वास संपादन करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी २६ कलमी कार्यक्रम तयार केला असून प्रकल्पग्रस्तांचे दु:ख अनुभवलेल्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी या एककलमी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात नवी मुंबई प्रस्तावित विमानतळातील विस्थापित होणाऱ्या दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांसाठी विविध योजना प्रत्यक्षात उतरवल्या जात आहेत. निफ्टीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत सुमारे ४० तरुणी आज फॅशन डिझाईनशी संबंधित प्रशिक्षण घेत आहेत. केवळ इंजिनीअर, डॉक्टर बनण्याच्या या स्पर्धेत सुई-धागा घेऊन हस्तकला करणारे तरुण-तरुणी सहज मिळत नसल्याने या संस्थाही मुलींना मोठय़ा आपुलकीने प्रशिक्षण देत आहेत. या संस्थेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या तरुणींना आयुष्यात मागे वळून बघण्याची वेळ येणार नाही असा विश्वास राधा यांनी व्यक्त केला. सिडकोने या तरुणींची फी भरलेली आहे. याव्यतिरिक्त काही प्रकल्पग्रस्त तरुणांनी बऱ्यापैकी शिक्षण घेतले आहे पण त्यांना मुंबईत जाऊन काम करण्याची भीती वाटते. यात काही शिष्टाचार आड येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे खारघर येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात टायला गाठ मारावी कशी, ब्लेझर घालावा कसा, डायनिंग टेबलवर बसून जेवावे कसे, कॉपरेरेट कार्यालयात बसावे, उठावे कसे हे शिकविण्यात येणार आहे. त्यासाठी शेकडो ब्लेझर विकत घेण्यात आले आहेत. यासाठी मुंबईतील नामांकित संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना सध्या हवे ते प्रशिक्षण देण्यास सिडको तयार आहे. ‘याराना’ या हिंदी चित्रपटात गावातून आलेल्या रवी अर्थात अमिताभ बच्चन यांना चांगला गायक बनविण्याअगोदर अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी किशन (अमजद खान) अनेक क्लृप्त्या करतो असे दाखविण्यात आले आहे. मुंबईला लागून असणाऱ्या नवी मुंबईतील अनेक गावांतील तरुणांमध्ये आजही हजारो रवी असून किशनची भूमिका सिडको पार पाडत आहे. या तरुणांना मुंबई आणि आजूबाजूच्या भपकेबाज शहरांची भीती वाटते. ती भीती घालवण्याचा सिडकोने प्रथम विचार केला असून प्रकल्पग्रस्तांसाठी इंग्लिश स्पिकिंग लॅब तयार केली आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांचे इंग्लिश उच्चार, त्यांतील सुधारणा आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. येणाऱ्या विमानतळासाठी लागणारे प्रशिक्षित कर्मचारी हे याच भूमीतून तयार व्हावेत असाही यामागे हेतू आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा विश्वास अधिक संपादन करण्यासाठी सिडकोने रोजगार शोधून देणाऱ्या तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांचे प्रतिनिधी सध्या दहा गावांत जाऊन तेथील तरुणांना त्यांच्या कुवतीनुसार हवी असलेली नोकरी मिळवून देण्यास मदत करीत आहेत. त्याचप्रमाणे सिडकोत लागणाऱ्या कनिष्ठ नोकरभरतीसाठी या तरुणांची तयारी करून घेतली जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांना रोजगार आणि उद्योग मिळावा यासाठी सिडकोने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा