सिडकोच्या ताब्यात असणाऱ्या खारघर, पनवेल, द्रोणागिरी, कळंबोली, उलवे, कामोठे या भागांत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सिडकोने सोशल मीडियाचा जास्तीतजास्त वापर करून घेण्याचे ठरविले असून वॉट्सअ‍ॅपवर कोणत्याही नागरिकाने माहिती व फोटो टाकल्यास सिडकोचा मुख्य आपत्ती नियंत्रण कक्ष त्याची तात्काळ दखल घेणार आहे. वॉट्सअ‍ॅपचा वापर करणारी सिडको पहिलीच शासकीय यंत्रणा ठरली आहे. सात वर्षांपूर्वीच्या २६ जुलैच्या प्रलयंकारी पावसात पनवेलमधील गाढी नदीला पूर आल्याने पनवेलमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली होती.
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील शासकीय व निमशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. केवळ शहर वसविण्याची जबाबदारी घेणाऱ्या शासनाच्या सिडको या कंपनीने याबाबतचा पहिल्यांदाच आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. सिडकोचे मिस्टर क्लीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मंगळवारी स्वत: पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या आपत्ती नियंत्रण कक्षाची जबाबदारी दीपक हरताळकर या अधिकाऱ्याकडे स्वतंत्रपणे सोपविण्यात आली आहे. सिडकोच्या अध्र्या भागात नवी मुंबई पालिकेचे व्यवस्थापन आहे. पण खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, उलवा, द्रोणागिरी यांसारख्या आपल्या नोडमध्ये सिडको हे व्यवस्थापन राबविणार आहे. त्यासाठी आजूबाजूच्या सर्व रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला असून सीबीडी व कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयाने आपत्ती काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर उलवा सेक्टर १९ अ मध्ये एक नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून उन्नतीजवळ एक रुग्णवाहिका कायमस्वरूपी ठेवण्यात आली आहे.
बेलापूर येथील मुख्यालयाच्या तळमजल्यावर हा आपत्ती नियंत्रण कक्ष मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. शॉर्टसर्किट, झाडे कोसळणे, सखल भागात पाणी साचणे यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी ६१०५४५४० हा क्रमांक चोवीस तास तयार ठेवण्यात आला असून ८८७९११३८८६ या मोबाइल क्रमांकावरील वॉट्सअ‍ॅप जनतेसाठी खुला राहणार आहे. या क्रमांकावर नागरिकांना पावसाळ्यात उद्भवणारी समस्या फोटोसह किंवा शब्दात पाठविल्यानंतर काही क्षणात त्याची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही भाटिया यांनी दिली. काही ठिकाणी अद्याप पावसाळी नाले तसेच गटारे साफ करण्याची कार्यवाही सुरू आहे ती येत्या आठवडय़ात पूर्ण करण्याचे आदेश भाटिया यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
सिडकोने पुष्पकनगर या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी नव्या नगरीच्या निर्माण कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे खूप मोठय़ा प्रमाणात भराव टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे पनवेलमध्ये पाणी साचण्याची भीती काही नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यांना दिलासा देताना सिडकोने सोशल मीडियाचा खुबीने उपयोग करण्याचे ठरविले असून सिडको क्षेत्रात कुठेही नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यास कळविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
याशिवाय सिडकोच्या ग्रामीण भागात या काळात औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे अपघातप्रवण भागात सिडको आपले खासगी सुरक्षारक्षक नेमण्यास तयार आहे. त्यामुळे या वर्षी पाऊस जास्त पडणार नाही, असे वेधशाळेने जाहीर केले असले तरी सिडको नैर्सगिक आपत्तीचा सामना करण्यास सज्ज झाली असल्याचे दिसून येते.

रुग्णवाहिकांचे मोबाइल क्रमांक लक्षात ठेवण्याचे आवाहन
पामबीच मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे, पण या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी आपल्या मोबाइलमध्ये जवळच्या एकही रुग्णवाहिकेचा क्रमांक न ठेवणाऱ्या नागरिकांबद्दल भाटिया यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या एका ओळखीच्या माणसाचा रुग्णवाहिकेची मदत लवकर न मिळाल्याने जीव गेल्याची खंत त्यांच्या मनात सळत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपत्ती काळात शहरातील रुग्णवाहिकांचे किंवा नियंत्रण कक्षाचे क्रमांक आपल्या मोबाइलमध्ये ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे सिडकोच्या वॉट्सअ‍ॅपवर अत्यावश्यक सर्व क्रमांक उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader