मुंबईहून नवी मुंबईत जलवाहतूक करणाऱ्या खासगी बोटींना थांबा मिळावा यासाठी मेरीटाईम बोर्डाने सिडकोकडे बेलापूर येथील खाडीपुलाखालील जागा मागितली होती. ती देण्यास सिडको तयार असून त्यासाठी तज्ज्ञांकडून लवकरच या जागेची पाहणी केली जाणार आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी या ठिकाणी आपली खासगी फ्लोटिंग जेट्टी उभारली असून ते बराच वेळा या ठिकाणाहून मुंबईत जलप्रवास करीत असल्याचे आढळून आले होते. नवी मुंबई-मुंबई जलप्रवासाचे नवी मुंबईकरांचे अनेक वर्षे जुने स्वप्न आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी वाशी ते मुंबई हावरक्रॉप्ट सेवा या ठिकाणी सुरू करण्यात आली होती, पण कामगारांच्या प्रश्नांवरून ही सेवा नंतर गुंडाळण्यात आली. नवी मुंबई व मुंबईला चांगला खाडीकिनारा असल्याने ही जलवाहतूक सेवा शक्य आहे. राज्य सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करीत असताना मुंबई ते नवी मुंबई खासगी जलप्रवास करणाऱ्या बोटीसाठी जेट्टी बांधता यावी म्हणून मेटीटाईम बोर्डाने सिडकोकडे परवानगी मागितली आहे. ही जमीन सिडकोच्या मालकीची आहे. सिडकोने या ठिकाणी अनेक प्रकल्पग्रस्तांना रेती उत्खननाचे परवाने दिलेले आहेत. त्यामुळे या भागातील रेती उत्खननाने खाडीकिनारे स्वच्छ आणि खोल झाले आहेत. त्यामुळे अनेक खासगी बोटी तसेच नवी मुंबई पोलिसांची गस्ती बोटीला हाच थांबा देण्यात आल्याने या बोटीलाही ती जेट्टी सोयीची पडणार आहे.

Story img Loader