‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या दोन सुपरहिट चित्रपटांनंतर रवि जाधवचा ‘बीपी’ अर्थात ‘बालक-पालक’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने
रवि जाधवने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दलची त्याची मतं ‘रविवार वृत्तांत’कडे व्यक्त केली..
० ‘बीपी’ हा चित्रपट नेमका का करावासा वाटला? किंवा एकांकिकेवर चित्रपट का केलास?
– सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, त्या एकांकिकेची संहिता आणि कथा मला खूप आवडली होती.अंबर आणि गणेशने खूपच समतोल साधत ही कथा लिहिली आहे. आज माझा मुलगा मोठा होतोय. तो मला कधीतरी असे प्रश्न विचारतो की, त्यांची उत्तरं त्याला द्यावीत का, आणि कशी द्यावीत, हा प्रश्न मला पडतो. पण ती उत्तरं मीच देणं अपेक्षित आहे. पण हा विचार प्रत्येक पालक करत नाही. त्याचवेळी बराक ओबामा यांनीही असं म्हटलं होतं की, सध्या अमेरिकेत १२-१३ वर्षांच्या मुली प्रेगनण्ट होत आहेत. त्याच वेळी मला जाणवलं की, ही काळाची गरज आहे. सेक्सबद्दल किंवा लैंगिक शिक्षणाबद्दल मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. आता माझं व्यक्त होण्याचं माध्यम आहे चित्रपट. मग मी या माध्यमाद्वारे या विषयाला वाचा फोडली.
० पण मग एकांकिकेचा चित्रपट का?
– एकांकिकेचं नाटक करावं, असे अनेक प्रस्ताव अंबर आणि गणेशकडे आले होते. पण मी त्यांना समजावलं की, नाटकाचा आवाका चित्रपटाच्या तुलनेत कमी आहे. त्याचबरोबर काही वर्षांनी कलाकार मोठे झाले की, नवे कलाकार घेऊन काम करायला लागतं. मात्र चित्रपटाचं तसं नाही. हा विषय नाटकापेक्षा चित्रपटाचाच आहे, हे त्याच वेळी माझ्या डोक्यात होतं. त्यानुसार मी अंबर आणि गणेशशी बोललो. त्यांनीही होकार दिल्यावर मग लगेचच काम सुरू झालं.
० तुझ्या या चित्रपटात एकही स्टार नाही. तुला आपण रिस्क घेतोय, असं नाही वाटलं का?
– हा प्रश्न खरंतर उत्तुंग किंवा रितेशला पडायला हवा होता. कारण त्या दोघांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पण तरीही मला विचारशील, तर एक पैशाचीही रिस्क वाटली नाही. कारण आमच्या चित्रपटाची मूळ संकल्पनाच मोठी आहे. ती जगभरात प्रत्येक पालकाशी आणि बालकाशी निगडित आहे. आणखी एक गोष्ट मराठी प्रेक्षकांच्या बाबतीत सांगाविशी वाटते. मराठी प्रेक्षकांचा पाठिंबा नेहमीच संहिता, पटकथा आणि त्यातील कल्पना यांना असतो. ते कधीच कलाकार पाहून चित्रपट पाहायला येत नाहीत. निदान मराठीत तरी तो ट्रेंड नाही.
० पण मग मराठीत एकाही कलाकाराला स्टार व्हॅल्यू नाही, यामुळे काही नुकसान नाही का? आणि ती स्टार व्हॅल्यू का नाहीए?
– मराठी चित्रपटाचा विचार दोन घटकांनी करायचा असतो. एक म्हणजे टाकलेल्या पैशांपैकी परत किती येतील? आणि दुसरा म्हणजे प्रेक्षक येईल का? या दोन घटकांचा विचार करून आम्हाला एका चौकटीत चित्रपट बनवावे लागतात. चित्रपटाची इमेज ही नेहमीच ‘लार्जर दॅन लाइफ’ असायला हवी. पण मग मराठी दिग्दर्शक, निर्माते सगळ्यांनाच तडजोड करावी लागते. तरीही आम्ही प्रयत्न करतो. पण हिंदीचं मार्केट खूप मोठं आहे. आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे एक चेहरा. तो चेहरा म्हणजे स्टार. त्यामुळे त्या स्टारला मोठं केलं जातं. आपल्याकडेही स्टार निर्माण होण्याची गरज आहे. ज्याच्या नावावर चित्रपट खपेल, असा एकही कलाकार आपल्याकडे नाही. पण भविष्यात तो नक्कीच तयार होईल.
० पण मग रितेशचा ‘बीपी’मधील सहभाग ही त्या स्टारडमची नांदी असेल का?
– नक्कीच. आणि ती असायलाच हवी. रितेशने या प्रोजेक्टमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्याच वेळी आमचा चित्रपट मराठीच्या कक्षा ओलांडून बाहेर पोहोचला. तो स्वत आज हिंदी चित्रपटसृष्टीत दहा र्वष वावरतोय. त्याच्यासाठी नवीन नवीन कथा लिहिणारी मंडळी आज आहेत. त्याने जे काही निरीक्षण केलंय, ते तो कुठेतरी मराठीत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा उपयोग आपण केलाच पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घे. हिंदीतली अनेक स्टार मंडळी आता निर्माता म्हणून का होईना, मराठीत यायला लागली आहेत. त्यामुळे आम्हा दिग्दर्शकांची जबाबदारी वाढली आहे.
० तू स्वत जाहिरात क्षेत्रातला आहेस. मराठी चित्रपट जाहिराती व प्रसिद्धीत कमी पडतात का?
– प्रश्नच नाही. पण जाहिरात आणि प्रसिद्धी करण्याची निर्मात्याची इच्छा नाही, असं मुळीच नाही. प्रत्येकालाच असं वाटतं की, आपल्या चित्रपटाची जाहिरात दणक्यात व्हावी. पण त्यासाठी पैसा लागतो. तो टाकला, तरी त्यातून फायदा होईल, याची शाश्वती नाही. अनेकदा निर्माते विचार करतात की, प्रेक्षक येत नाही, तर जाहिरात करून काय उपयोग? तर प्रेक्षक म्हणतात, जाहिरात होत नाही, तर आम्हाला कळणार कसं? हा प्रश्न म्हणजे ‘कोंबडी आधी की, अंडं’ असा आहे. माझ्या मते चित्रपटाच्या नावापासूनच कुतुहल जागं झालं पाहिजे. मग संपूर्ण चित्रपट निर्माण होईपर्यंत या ना त्या कारणाने ते कुतुहल जागं ठेवलं पाहिजे. ‘बालक-पालक’ची प्रसिद्धी आम्ही गेल्या वर्षांपासून विविध मार्गानी करत आहोत.
० तुझ्या मते चित्रपट काय आहे? व्यवसाय की, कला?
– तू आर्ट स्कूलचा अभ्यासक्रम पाहिला आहेस का? त्यात ना ‘फाइन आर्ट्स’ आणि ‘कमर्शिअल आर्ट्स’ असे दोन पर्याय असतात. माझ्या मते चित्रपट म्हणजे कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा मिलाफ आहे. एखाद्या उत्तम दिग्दर्शकाला कला आणि व्यवसाय या दोन्ही बाजू माहीत असणं आवश्यक आहे. एक कोटीचं बजेट सांगून दीड कोटींमध्ये चित्रपट पूर्ण करणाऱ्या दिग्दर्शकाला व्यावसायिकतेचं अंग नसतं. आणि मराठीत तर या दोन्हीची उत्तम सांगड असणारी अनेक उदाहरणं आहेत. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, दादा कोंडके, राजा परांजपे या सगळ्यांचे चित्रपट कलात्मक होतेच पण त्याचबरोबर त्यांनी तिकीटबारीवरही चांगलं यश कमावलं.
० जाहिरात क्षेत्राचा फायदा दिग्दर्शनात किती होतो?
– खूप जास्त. प्रत्येक सीन म्हणजे एक जाहिरात आहे, असं ठरवलं की तो सीन आटोपशीर तर होतोच. पण त्याचबरोबर त्याला एक चांगली सुरुवात आणि शेवटही असतो. मी जाहिरात क्षेत्रात शिस्त आणि नियोजन शिकलो. माझ्या कंपनीचं ब्रीदवाक्यच आहे, ‘कन्सीव्ह, बिलिव्ह अॅण्ड अचिव्ह’! एखादी कल्पना डोक्यात आणायची असते. त्यानंतर त्या कल्पनेवर विश्वास ठेवायचा असतो. मग ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडायचं असतं. मला जाहिरातीत हे शिकायला मिळालं. पण आजचे नवीन दिग्दर्शक खूपच उत्तम काम करतात. चित्रिकरणाआधीचा त्यांचा अभ्यास चांगला असतो. मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय, हे खरंच खूप चांगलं आहे.
० रवि आम्हाला हिंदीत नाही का दिसणार?
– खरं सांगू का, हिंदीतला छोटा चित्रपट करण्यापेक्षा मराठीतला मोठा चित्रपट करायला मला नेहमीच आवडेल. हिंदी निर्माते माझ्याकडे येतात, तेव्हा मराठी दिग्दर्शक आहे, तर कमी पैशात चांगला चित्रपट करेल, अशी त्यांची धारणा असते. मला ते नकोय. एखादा मोठा चित्रपट मिळाला हिंदीत, तर तो देखील करू की!
० कॅमेरा ही चित्रपटाची भाषा असते. मग मराठी भाषेतल्या चित्रपटांना व्यवसायाच्या मर्यादा असतात, असं का बोललं जातं?
– माझ्या मते चित्रपट हा भाषेच्या पलिकडे आहे. तरीही तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं, तर मराठी चित्रपट हे साधारपणे मराठमोळ्या विषयांवरचे असतात. प्रत्येक भाषेची एक संवेदना असते, एक देहबोली असते. ती देहबोली इतर भाषेतील लोक नाही समजून घेऊ शकत. म्हणून व्यावसायिक दृष्टीने मर्यादा पडतात.
० पण तरीही आपण इराणी किंवा कोरियन चित्रपट पाहतोच की..
– आपण नाही. केवळ एक क्लास ते चित्रपट पाहतो. सर्वसामान्य माणसाला त्यांच्याशी फारसं देणंघेणं नसतं. त्याला फक्त दोन घटका शांती हवी असते. पण मराठी चित्रपटही आता या प्रांताच्या मर्यादा ओलांडतोय की. माझा ‘नटरंग’ दक्षिण भारतातही प्रसिद्ध आहे. असे अनेक मराठी चित्रपट आहेत.