हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत ‘दर्यामें खसखस’ गल्ला जमवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीत वाद मात्र हिंदीच्या तोडीचेच होतात. गेल्या वर्षी शाहरूख आणि अजय देवगण यांच्यातील वादाची मराठी आवृत्ती यंदा दिसण्याची शक्यता आहे. ‘मैत्र एण्टरटेन्मेण्ट’ निर्मित ‘येडा’, इंद्रराज फिल्म्स निर्मित ‘लेक लाडकी’ आणि मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हे तीन चित्रपट यंदा एकाच दिवशी म्हणजे १९ एप्रिलला प्रदर्शित होत आहेत. यापैकी ‘लेक लाडकी’च्या निर्मात्यांनी एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहे व्यापण्याच्या दृष्टीने आघाडी घेतली आहे. त्यामुळे इतर दोन चित्रपटांना चित्रपटगृहे मिळवताना मारामार होण्याची शक्यता आहे.
यशवंत भालेकर दिग्दर्शित आणि अतुल ओहोळ निर्मित ‘लेक लाडकी’ या चित्रपटात उमेश कामत, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक आणि प्रियांका यादव अशी तगडी कलाकारमंडळी आहेत. तर, ‘येडा’ या चित्रपटातही सतीश पुळेकर, किशोर बेळेकर, किशोरी शहाणे, अनिकेत विश्वासराव हे महत्त्वाचे कलाकार आहेत. या चित्रपटाद्वारे आशुतोष राणा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याने या चित्रपटाची चर्चा जोरात आहे. त्याशिवाय मृणाल कुलकर्णी या गुणी अभिनेत्रीचे दिग्दर्शनातील पहिले पाऊल असलेल्या ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटातही सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी आणि सुनील बर्वे हे प्रमुख कलाकार आहेत.
या तीन चित्रपटांपैकी ‘लेक लाडकी’ या चित्रपटासाठी निर्मात्याने आत्ताच १०० एकपडदा चित्रपटगृहे आरक्षित केली आहेत. ही संख्या १५०वर जाण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली. त्याचप्रमाणे बहुपडदा चित्रपटगृहांतही किमान ५० पडदे व्यापण्याची तयारी ‘इंद्रराज फिल्म्स’ने चालवली आहे. ‘येडा’साठी एकपडदा आणि बहुपडदा मिळून तब्बल १२५ चित्रपटगृहांचे आरक्षण झाले आहे. या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत ‘प्रेम म्हणजे..’साठी फक्त ७५ ते १०० चित्रपटगृहांचे आरक्षण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आतापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये सुरू असलेली चित्रपटगृहांसाठीची रस्सीखेच आता मराठीतही अवतरली आहे. मात्र एकमेकांना समजून उमजून घेणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीत या रस्सीखेचीचा फायदा एका चित्रपटाला होणार की, तीनही चित्रपटांचा कपाळमोक्ष होणार, याकडे चित्रपट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चित्रपटगृह वाटणीचा वाद आता मराठीतही?
हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत ‘दर्यामें खसखस’ गल्ला जमवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीत वाद मात्र हिंदीच्या तोडीचेच होतात. गेल्या वर्षी शाहरूख आणि अजय देवगण यांच्यातील वादाची मराठी आवृत्ती यंदा दिसण्याची शक्यता आहे.
First published on: 23-03-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cinema theater sharing debate now in marathi also