टीव्हीवरील ‘रिअॅलिटी शो’ची संकल्पना आता रूढ झाली असली आणि प्रत्येक रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाविषयीचे कुतूहल, त्यातील पहिल्या वहिल्या विजेत्यांना मिळालेली लोकप्रियता त्यानंतर आलेल्या पर्वातील तरुणांना मिळत नाही. तरीही रिअॅलिटी शो प्रत्येक वाहिनीला मोठय़ा प्रमाणात टीआरपी-जीआरपी मिळवून देतात. किंबहुना दैनंदिन मालिकांमधल्या रटाळ कथानकांपेक्षा रिअॅलिटी शोमध्ये अधिक नाटय़, अधिक औत्सुक्य प्रेक्षकांना वाटते. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे लेखन करून संकल्पनेत थोडेफार बदल करून प्रेक्षकांना आणि जाहिरातदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न वाहिन्यांच्या ‘क्रिएटिव्ह टीम’ला सातत्याने करावा लागतो.
रिअॅलिटी शोमुळे वाहिनीला मिळणारे कोटय़वधींचे उत्पन्न आणि वाहिनीची लोकप्रियता टिकून राहावी यासाठी ‘जनरल एण्टरटेन्मेंट कॅटेगिरी’ (जीईसी)मधील वाहिन्यांवरील रिअॅलिटी शोंचे दरवर्षी एकामागून एक नवे पर्व पाहायला मिळते. संकल्पना आणि त्याचे लेखन-मांडणी हाच सर्व रिअॅलिटी शोंचा प्राण आहे. या वर्षांत आलेल्या रिअॅलिटी शो पाहिले तर संकल्पनांमध्ये बदल केला आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’ या रिअॅलिटी शोव्यतिरिक्त बाकी सर्व रिअॅलिटी शोंच्या नव्या पर्वात परीक्षक मात्र जुनेच आहेत. रिअॅलिटी शोंचे चक्र सुरू ठेवून वाहिन्या लोकप्रियता टिकविण्याची धडपड करीत आहेत.
सध्या ‘डान्स इंडिया डान्स’ या झी टीव्ही रिअॅलिटी शोचे ‘डीआयडी सुपरमॉम्स’ हे पर्व सुरू आहे. डीआयडीमध्ये सुपरमॉम्स ही नवीन संकल्पना आणून वाहिनीने गृहिणींना नृत्य करण्याची संधी दिली आहे. लहान मुलांच्या पर्वामध्ये त्यांचे आई-बाबा, नातेवाईक यांना फार औत्सुक्य असते. लहान मुले-मुली रिअॅलिटी शोमध्ये नृत्य करतात तेव्हा त्यांचे आई-बाबा, सगळे कुटूंब त्यांच्यासोबत असते. त्यामुळेच नवीन संकल्पना म्हणून या मुलांच्या मातांनाच स्पर्धक म्हणून घेण्याची शक्कल लढविण्यात आली. देशभरातील वेगवेगळ्या शहरातील गृहिणींना स्पर्धक म्हणून घेतल्याने या रिअॅलिटी शोची लोकप्रियता खूप वाढली.
‘इंडियन आयडॉल’ हा म्युझिक रिअॅलिटी शोचे प्रत्येक पर्व गाजले. आता पाच ते पंधरा वयोगटातील मुलामुलींचे इंडियन आयडॉल ज्युनियर ही नवीन संकल्पना आणण्यात आली असून नुकतेच याचे पहिले पर्व सुरू झाले आहे. श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि शेखर रवजियानी असे तिघे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. परीक्षक म्हणून पहिल्यांदाच हे तिघे गायक-संगीतकार छोटय़ा पडद्यावर आले आहेत.
कलर्स वाहिनीवर ‘झलक दिखला जा’ चे नवे पर्वही नुकतेच सुरू झाले असून त्यामध्ये करण जोहर, माधुरी दीक्षित, रेमो हे जुनेच परीक्षक आहेत. याचे कारण नृत्य आणि सिनेमा यातली यांची कारकीर्द गाजली आहे. माधुरीचा करिष्मा अजूनही प्रेक्षकांना भुरळ घालतोय. रेमो स्वत:च नृत्य दिग्दर्शक असल्यामुळे आणि त्याचा एबीसीडी हा सिनेमा गाजल्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. त्याचबरोबर सध्या सुरू झालेले नवे पर्व हे सेलिब्रिटी पर्व आहे.
गायक शान, श्वेता तिवारी, मेघना मलिक, सिद्धार्थ शुक्ला, द्रष्टी धामी, इंडिया हॅज गॉट टॅलेण्टमधील विजेते सोनाली, सुमन, करणबीर बोरा, एकता कौल, क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकान्त, सुरेश मेनन, एबीसीडीमधील अभिनेत्री लॉरेन असे या पर्वातील स्पर्धक आहेत. सेलिब्रिटी परीक्षकांमुळे आणि सादरीकरणामुळे ‘झलक..’विषयी प्रेक्षकांमध्ये औत्सुक्य आहे. त्याचबरोबर यंदाच्या पर्वामध्ये शान आणि क्रिकेटपटू श्रीकांत यांसारखे दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती हेही याचे वैशिष्टय़ आहे. बाकी सर्व स्पर्धक हे मुख्यत्वे ‘टीव्ही स्टार’ कलावंत आहेत.
‘इंडियाज् बेस्ट ड्रामेबाज’ या नवीन संकल्पनेचा रिअॅलिटी शो झी टीव्हीवर नुकताच झाला. यामध्ये नृत्य, गायनऐवजी पाच ते बारा वर्षांच्या मुलामुलींनी आपले अभिनय कौशल्य छोटय़ा स्किटमधून दाखविले. अनुराग बासूसारखा दिग्दर्शक या कार्यक्रमाचा परीक्षक होता. आदित्य सिंघल हा पहिल्या पर्वाचा विजेता ठरला. रिअॅलिटी शोवर कितीही टीका होत असली तरी वाहिन्यांना आपली लोकप्रियता टिकविण्यासाठी ते आवश्यक आहेत. रिअॅलिटी शोचे हे चक्र न संपणार आहे, हे निश्चित!
चक्र ‘रिअॅलिटी शो’चे!
टीव्हीवरील ‘रिअॅलिटी शो’ची संकल्पना आता रूढ झाली असली आणि प्रत्येक रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाविषयीचे कुतूहल, त्यातील पहिल्या वहिल्या विजेत्यांना मिळालेली लोकप्रियता त्यानंतर आलेल्या पर्वातील तरुणांना मिळत नाही. तरीही रिअॅलिटी शो प्रत्येक वाहिनीला मोठय़ा प्रमाणात टीआरपी-जीआरपी मिळवून देतात.
Written by badmin2
First published on: 09-06-2013 at 08:17 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Circle of reality show