पालिका निवडणुकीपूर्वी आपल्याला निवडून देणाऱ्या मतदार जनतेला आपण दिलेली आश्वासने पूर्ण केली की नाही. आपल्या कामाविषयी नागरिक समाधानी आहेत की नाहीत. प्रभागातील जनतेच्या काही समस्या आहेत का हे जाणून घेण्याचा, नागरिकांनी आपल्या कामाचे परीक्षण करून घेण्याचा उपक्रम डोंबिवलीत मनसे नगरसेवकाने पार पाडला.
या कार्यक्रमाला प्रभागातील शंभर सोसायटय़ांचे पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचे शिव मार्केट प्रभागातील नगरसेवक राहुल चितळे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. गेल्या अडीच वर्षांपूर्वी आपण जनतेला दिलेल्या विकासकामे व अन्य आश्वासनांपैकी किती आश्वासने आपण पूर्ण केली याचा लेखाजोखा चितळे यांनी उपस्थित नागरिकांसमोर मांडला.
प्रभागातील रस्ते, गटारे, पदपथ, चौक सुशोभीकरणाची कामे बहुतांशी पूर्ण करण्यात आली आहेत. नव्याने काही महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात येणार आहेत, असे चितळे यांनी बैठकीत सांगितले. नागरिकांनी करण्यात आलेल्या विकासकामांविषयी समाधान व्यक्त केले. काही नागरिकांनी प्रभागातील नागरी विकासाच्या समस्यांविषयी, रात्रीच्या वेळेतील फेरीवाल्यांना हटविण्याविषयी सूचना केल्या. त्याचीही दखल घेण्याचे आश्वासन नगरसेवक चितळे यांनी नागरिकांना दिले.
या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव, वाहतूक अधिकारी पाटील, पालिका अधिकारी धोत्रे, संजय कुमावत, मनसे पदाधिकारी अमृता जोशी, तुषार महाडदळकर, सुनील प्रधान, अनिल जोशी इतर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा