कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून रस्त्यांचे सीमेंट काँक्रिटीकरण अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काँक्रीट रस्ते कामांचा वेग असाच राहिला तर पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे ठेकेदारांच्या चर्चेतून समजते. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सिमेंट रस्त्यांची कामे वेगाने होण्यासाठी उपयोगिता सेवा (युटिलिटी) कामाच्या निविदा काढण्याचे काम रखडल्याने त्याचा परिणाम रस्ते कामांवर होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा दूरध्वनी, जलवाहिन्या, महावितरण व अन्य सेवा वाहिन्या आहेत. या वाहिन्या जोपर्यंत अन्यत्र स्थलांतरित केल्या जात नाहीत तोपर्यंत सिमेंट रस्त्यांची कामे करणे शक्य होणार नाही, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. पालिका अधिकारी, पदाधिकारी केवळ टक्केवारी आणि निविदेमध्ये अडकून पडल्याने या सिमेंटच्या संथगती कामाकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नसल्याचे सांगण्यात येते. प्रकल्प विभागाचे अभियंता फक्त मंत्रालय आणि मुंबई वाऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना रस्ते कामाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
कल्याण-डोंबिवलीत सिमेंट रस्त्यांची तुकडे पद्धतीने कामे करण्यात येत आहेत. डोंबिवलीत मानपाडा रस्ता, मंजुनाथ शाळा, भावे सभागृह, राजाजी रस्ता सिमेंट कामांसाठी गेले महिनाभर खणून ठेवला आहे. ही कामे संथगतीने सुरू असल्याने या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतुकीने धुळीचे लोट पसरत आहे. त्यामुळे नागरिक विविध व्याधींनी आजारी आहेत. मुंबई व नवी मुंबई पालिका हद्दीत सिमेंटसाठी रस्ता खणल्यानंतर तात्काळ डेब्रिज उचलले जाते. रस्त्याचा खालचा थर तात्काळ तयार करून तो चालण्यासाठी मोकळा केला जातो. अन्य थर टाकून महिनाभरानंतर रस्ता मोकळा केला जातो. याउलट परिस्थिती कल्याण-डोंबिवलीतील अभियंते, ठेकेदारांकडून अवलंबली जात आहे. प्रकल्प विभागाचे अभियंता प्रमोद कुलकर्णी या सगळ्या व्यवस्थेला जबाबदार असल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे. आयुक्त भिसे यांनी त्यांची संथगती कामाबद्दल दालनात कानउघडणी केली असल्याचे सांगण्यात येते.
डोंबिवलीत खंदक
डोंबिवली शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात दूरध्वनी, महावितरण व इतर उपयोगिता सेवा टाकण्याच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणात रस्त्यांच्या कडेला चऱ्या खणण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या कडेला आणि दुकानांमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणी हे खंदक खणल्याने नागरिकांची आबाळ होत आहे. जागोजागी मातीचे ढीग, धुरळा, वाहतूक कोंडीत यामुळे आणखी भर पडली आहे. वाहन चालक, नागरिक या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा